पतीपासून वेगळे राहणे पत्नीला पडले महाग
By admin | Published: January 6, 2016 03:56 AM2016-01-06T03:56:01+5:302016-01-06T03:56:01+5:30
पतीपासून वेगळे राहणे व क्रूरतेने वागणे एका पत्नीला महागात पडले. पत्नीची विभक्तता व क्रूरता या आधारावर कौटुंबिक ...
पतीस घटस्फोट : हायकोर्टात पत्नीचे अपील खारीज
नागपूर : पतीपासून वेगळे राहणे व क्रूरतेने वागणे एका पत्नीला महागात पडले. पत्नीची विभक्तता व क्रूरता या आधारावर कौटुंबिक न्यायालयातून पतीला मिळालेला घटस्फोट मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवला आहे. तसेच, कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध पत्नीने केलेले अपील फेटाळले आहे.
न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व झेड. ए. हक यांनी हा निर्वाळा दिला आहे. प्रकरणातील पती-पत्नी संजय व रिचा हे दोघेही व्यवसायाने डॉक्टर आहेत. संजय नागपुरात खासगी व्यवसाय करतो तर, रिचा रेवा (मध्य प्रदेश) येथे वैद्यकीय अधिकारी आहे. १६ फेब्रुवारी १९९७ रोजी त्यांचे लग्न झाले होते. लग्नानंतर ते काही महिने एकत्र राहिले. रिचाची वागणूक चांगली नव्हती. दरम्यान, ६ फेब्रुवारी १९९९ रोजी तिला रेवा येथे वैद्यकीय अधिकारीपदी नोकरी मिळाली. यानंतर ती मे-१९९९ ते फेब्रुवारी-२००० पर्यंत रेवा येथे राहिली. या काळात ती एकदाही नागपुरात आली नाही.
ती नोकरी सोडण्यास तयार नव्हती. यामुळे संजयने आॅक्टोबर-२००१ मध्ये कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती.
ही याचिका मंजूर झाली. परिणामी रिचाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती पण, प्रकरणातील विविध बाबींमुळे तिला दिलासा मिळाला नाही.(प्रतिनिधी)