जिच्यामुळे नवजीवन भेटले, तिच्यावरच हातोड्याने वार; नंदनवन झोपडपट्टीत थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 06:09 PM2023-07-19T18:09:23+5:302023-07-19T18:09:45+5:30
‘संशयाच्या भूता’ने केला घात, मद्यपी पतीकडून पत्नीचा खून
नागपूर : संशयाच्या भूताने झपाटलेल्या एका मद्यपी पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यावर हातोड्याने प्रहार करत तिची हत्या केली. नंदनवन झोपडपट्टीत सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
अर्चना भारस्कर (३८) असे पत्नीचे नाव असून रमेश मतिराम भारस्कर (४८) हा आरोपी पती आहे. रमेश हा आठवडी बाजारात भाजी-मासोळी विकायचा तर अर्चना ही धुण्याभांड्याचे काम करायची. दोघांनाही १२ व ६ वर्षांच्या दोन मुली आहे. रमेश हा व्यसनी होता व दारूच्या नशेत तो पत्नीशी नेहमीच वाद घालायचा. त्याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता व त्यातून त्याने अनेकदा तिला मारहाणदेखील केली होती. यामुळेच तिने रमेशला सोडून माहेर गाठले होते. मात्र सहा महिन्यांपूर्वी ती मोठ्या मुलीसह परत आली.
रमेशचा भाऊ अशोक हा त्याच्या शेजारी राहतो. सोमवारी अशोकच्या कुटुंबात घरगुती कारणावरून वाद झाला. हा वाद मिटवण्यासाठी रमेशची बहीण बेबीबाई नेमाडे या वर्ध्याहून आल्या होत्या. त्यांच्यासोबत अर्चनाही आपल्या मुलीसह अशोकच्या घरी गेली. सकाळी कामावर जायचे असल्याने ती रात्री ११ वाजता घरी परतली तर मुलगी पूजा ही काका अशोकच्या घरी झोपली. दरम्यान बेबीताईदेखील वर्ध्याला परतल्या. अर्चना घरी पोहोचताच रमेशने परत तिच्या चारित्र्यावरून वाद घालण्यास सुरुवात केली. अर्चनाने त्याला प्रत्युत्तर दिले असता रमेश संतापला व त्याने घरातील हातोड्याने तिच्या डोक्यावर प्रहार केले. यात अर्चनाचा जागीच मृत्यू झाला.
रात्रभर तिच्या मृतदेहासोबत तो घरीच होता व पहाटे ५ वाजता दरवाजाला कुलूप लावून कॉलनीतील पानठेल्यावर गेला. तेथून त्याने बहीण बेबीबाईला फोन करून अर्चनाची हत्या केल्याचे सांगितले. बेबीबाईने लगेच अशोकला ही माहिती दिली. अशोक रमेशच्या घरी पोहोचला तेव्हा त्याला कुलूप दिसले. खिडकीतून डोकावले असता अर्चना जमिनीवर पडलेली दिसली. अशोकच्या माहितीवरून नंदनवन पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी रमेशला अटक केली. या घटनेमुळे दोन्ही लहान मुलींना मोठा धक्का बसला आहे.
अनेक वर्षांपासून सुरू होता छळ
अर्चना ही रमेशची दुसरी पत्नी होती. रमेशच्या संशयी स्वभावामुळे पहिली पत्नी लग्नानंतर सहा महिन्यातच त्याला सोडून चालली गेली होती. १३ वर्षांपूर्वी रमेशने अर्चनाशी लग्न केले होते. लग्नानंतर चार वर्षांनी अर्चना त्याच्या छळाला कंटाळून मुलींसह मूर्तिजापूर येथे माहेरी गेली. रमेशने दोन ते तीन वेळा तिच्या माहेरी जाऊन माफी मागितली होती व ती परत आली होती. मात्र परत रमेशचा छळ वाढल्याने ती सहा वर्षांपासून मूर्तिजापूर येथे राहत होती. सहा महिन्यांपूर्वी रमेशची प्रकृती खालावली होती. त्यानंतर रमेशच्या नातेवाइकांच्या विनंतीनंतर अर्चना नागपुरात परत आली होती.
अर्चनामुळेच रमेश मृत्यूशय्येतून परतला होता. तीन महिने त्याला स्वतःच्या हाताने खाऊ घातले. जास्त मेहनत करून तिने त्याच्या उपचारासाठी पैसे जमा केले. इतकेच काय तर त्याच्याकडे लक्ष देता यावे यासाठी लहान मुलीला भावाकडे ठेवले होते. मात्र जिच्यामुळे नवीन आयुष्य मिळाले तिच्यावर रमेश संशय घेतच राहिला.