महिलादिनीच पत्नीची हातोड्याने हत्या; सकाळीच केली होती पतीची तक्रार
By योगेश पांडे | Published: March 8, 2023 09:50 PM2023-03-08T21:50:52+5:302023-03-08T21:51:44+5:30
Nagpur News एकीकडे महिलादिनानिमित्त संपूर्ण शहरांत महिलांचा सन्मान-सत्कार सुरू असताना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत पतीकडून पत्नीची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे नागपूर हादरले आहे.
नागपूर : एकीकडे महिलादिनानिमित्त संपूर्ण शहरांत महिलांचा सन्मान-सत्कार सुरू असताना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत पतीकडून पत्नीची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे नागपूर हादरले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शहरांत होळी-धुळवडीनिमित्त कडेकोट बंदोबस्त असतानादेखील शहरात तीन दिवसांत दोन हत्यांची नोंद झाली.
कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिनीमाता नगरात अमर (५०) व लतिका भारद्वाज (३०) हे दांपत्य काही काळापासून वास्तव्याला होते. अमर हा भाजीविक्रेता असून लतिका ब्युटीपार्लरमध्ये काम करायची. दोघांनाही दोन मुली असून अमर हा संशयी स्वभावाचा आहे. लतिकावर तो नेहमी संशय घ्यायचा व त्यावरून अनेकदा त्यांच्यात वाद व्हायचे. काही वेळा तर वाद प्रचंड विकोपाला गेले होते. त्यामुळे दोघेही एकाच घरात वेगवेगळे रहायचे. मंगळवारी दुपारी प्लबिंगचे काम करण्यासाठी एक युवक आला व अमरने त्याला विरोध केला. यावरून अमरचा व लतिकाचा वाददेखील झाला. होळी असल्याने लतिकाने वाद जास्त वाढविला नाही.
बुधवारी सकाळी तिने कळमना पोलीस ठाणे गाठून अमरविरोधात तक्रार केली व पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. ही बाब कळताच अमर तणतणत दुपारी घरी आला. तक्रारीचा राग मनात ठेवून अमरने पत्नी लतिकाशी भांडण केले व तिच्या डोक्यावर हातोड्याने वार केले. त्याने इतक्या जोराने प्रहार केले की लतिका गंभीर जखमी झाली व तिचा घरातच मृत्यू झाला. तिच्या किंकाळ्या ऐकून आजुबाजूचे लोक गोळा झाले. लतिका रक्तबंबाळ अवस्थेत पडली होती, तर अमरने तेथून पळ काढत थेट कळमना पोलीस ठाणे गाठले. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले व लतिकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. पोलिसांनी आरोपी अमरला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली होती.