दाढीच्या ब्लेडने पत्नीची हत्या, पतीला जन्मठेप; सत्र न्यायालयाचा निर्णय
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: October 30, 2023 05:50 PM2023-10-30T17:50:16+5:302023-10-30T17:50:36+5:30
चारित्र्यावर संशय घेत होता
नागपूर : दाढीची ब्लेड व कुऱ्हाडीने पत्नीची निर्घृण हत्या करणाऱ्या पतीला सोमवारी जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली. सत्र न्यायालयाचे न्या. गणेश देशमुख यांनी हा निर्णय दिला. ही घटना रामटेक येथील आहे.
महेश रुपचंद खंडाते (४०), असे आरोपीचे नाव आहे. मृताचे नाव पुष्पा होते. महेश रामटेकजवळच्या खिंडसी तलाव परिसरातील धाब्यात व धाबा मालकाच्या शेतात काम करीत होता. तसेच, तेथील घरात पत्नी, मुलगा व आईसोबत राहत होता. महेशला दारुचे व्यसन होते. तो पुष्पाच्या चारित्र्यावर संशय देखील घेत होता. त्यातून त्यांचे नेहमीच भांडण होत होते. ८ एप्रिल २०१८ रोजी मध्यरात्रीनंतर त्यांचा नेहमीप्रमाणे वाद झाला.
दरम्यान, आरोपीने टोकाचे पाऊल उचलून दाढीच्या ब्लेडने पुष्पाचा गळा कापला व तिच्या डोक्यावर कुऱ्हाडीचा जोरदार वार केला. परिणामी, पुष्पा जाग्यावरच ठार झाली. त्यानंतर महेश लहान मुलाला सोबत घेऊन फरार झाला होता. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. अभय जिकार यांनी कामकाज पाहिले. त्यांनी आरोपीविरुद्ध १० साक्षीदार तपासले. तसेच, परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावर आरोपीवरील गुन्हा सिद्ध केला. हत्येसाठी वापरलेली ब्लेड व कुऱ्हाड आरोपीच्या घरातच मिळून आली होती.