पत्नीने ३ लाखात दिली पतीच्या हत्येची सुपारी; ग्रामीण पाेलिसांनी ठाेकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 10:34 PM2021-09-22T22:34:00+5:302021-09-22T22:34:53+5:30
Nagpur News वंजारीनगर येथील प्राॅपर्टी डीलर प्रदीप बागडे हत्याकांडाचा छडा पाेलिसांनी लावला. या प्रकरणात पत्नीनेच ३ लाख रुपयात हत्येची सुपारी दिल्याचे समाेर आले आहे.
नागपूर : वंजारीनगर येथील प्राॅपर्टी डीलर प्रदीप बागडे हत्याकांडाचा छडा पाेलिसांनी लावला. या प्रकरणात पत्नीनेच ३ लाख रुपयात हत्येची सुपारी दिल्याचे समाेर आले आहे. ग्रामीण पाेलिसांच्या एलसीबी पथकाने बागडेंची पत्नी सीमा हिला बेड्या ठाेकल्या. यादरम्यान हत्येतील आराेपी पवन चाैधरीचे पाेलिसांशीही मधुर संबंध असल्याची बाब समाेर आली आहे.
वंजारीनगर निवासी प्राॅपर्टी डीलर प्रदीप बागडे यांचे अपहरण करून पवन चाैधरीने त्याच्या अल्पवयीन सहकाऱ्याशी मिळून हत्या केली हाेती. मंगळवारी सकाळी खापा येथे मृतदेह मिळाल्यानंतर हत्या झाल्याचे उघड झाले. यानंतर हुडकेश्वर पाेलिसांनी पवन चाैधरी व अल्पवयीन सहकाऱ्याला ताब्यात घेतले. पवन हा बागडेंच्या जमिनीवर चायनीजचा ठेला लावत हाेता. जमिनीच्या वादातूनच बागडेंची हत्या केल्याचे त्याने सांगितले. मात्र पाेलिसांना त्याच्या कबुलीबाबत संशय हाेता. त्यानंतर हुडकेश्वर पाेलिसांनी दाेघांनाही ग्रामीण पाेलिसांच्या स्वाधीन केले. एलसीबीने कसून चाैकशी केल्यानंतर पवनने बागडेच्या पत्नीनेच पतीच्या हत्येसाठी ३ लाख रुपयांची सुपारी दिल्याचे कबूल केले. त्यानंतर आज दुपारी सीमाला अटक करण्यात आली.
सूत्रांच्या माहितीनुसार, सीमा व प्रदीप बागडे यांच्यामध्ये वाद वाढले हाेते. सीमाच्या मित्रत्वाबाबत प्रदीप प्रश्न करीत हाेता व ही बाब सीमाला आवडत नव्हती. बागडेने प्राॅपर्टी डीलिंगमधून संपत्ती जमविली हाेती. मात्र ताे सीमाच्या मार्गातील काटा ठरला हाेता. त्यामुळे स्वत:चा मार्ग माेकळा करण्यासाठी पतीच्या हत्येची याेजना आखली.
पवन त्यांच्या घरी भाड्याने राहत हाेता व कार वाॅशिंगसाठी बागडेच्या घरी येत-जात हाेता. सीमाने पवनला ३ लाख रुपयात हत्येची सुपारी दिली. ५० हजार रुपये ॲडव्हान्स दिले व २.५० लाख रुपये हत्येनंतर देण्याचे ठरले. १६ सप्टेंबरला पवन आणि त्याच्या सहकाऱ्याने बागडेला वरुडला नेले. येथेच हत्या करून मृतदेह पोत्यात भरून सिंदेवाही मार्ग खापा येथे फेकून दिला. मिळालेल्या माहितीनुसार पवनचे हुडकेश्वर व अजनी येथील पाेलिसांशी मित्रत्व आहे. ताे अधिकारी व कर्मचाऱ्यांना पार्टी देत हाेता. त्यामुळे त्याने हुडकेश्वर पाेलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून समर्पण केल्याचे बाेलले जात आहे. सीमाने हत्येचे खरे कारण सांगितले नाही पण पाेलिसी हिसका दाखविल्यानंतर सत्य बाहेर येईल, अशी शक्यता आहे.