पत्नी रात्रंदिवस दुसऱ्यासोबत राहायची मोबाईलवर संपर्कात; नवरोबाने केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 12:05 PM2021-02-17T12:05:39+5:302021-02-17T12:07:36+5:30

Nagpur News संशयाचे भूत डोक्यावर बसल्याने एका नवरोबाने त्याच्या नवविवाहित पत्नीची अमानूषपणे हत्या केली.

The wife used to stay in touch with others on her mobile phone day and night; Murder committed by Husband | पत्नी रात्रंदिवस दुसऱ्यासोबत राहायची मोबाईलवर संपर्कात; नवरोबाने केली हत्या

पत्नी रात्रंदिवस दुसऱ्यासोबत राहायची मोबाईलवर संपर्कात; नवरोबाने केली हत्या

Next
ठळक मुद्देअनैतिक संबंधाचा संशय दोन दिवसांतील दुसरी घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - एमआयडीसीत पतीने नवविवाहित पत्नीची हत्या केल्याच्या घटनेच्या वृत्ताची शाई सुकायची असतानाच पारडीतही सोमवारी मध्यरात्री पुन्हा एक असेच भीषण हत्याकांड घडले. संशयाचे भूत डोक्यावर बसल्याने एका नवरोबाने त्याच्या नवविवाहित पत्नीची अमानूषपणे हत्या केली. ज्योती ललित मार्कंडे (वय २२) असे मृत महिलेचे नाव आहे, तर तिची हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव ललित समयलाल मार्कंडे (वय २५) आहे.

आरोपी ललित मूळचा राजनांदगाव (छत्तीसगड) येथील रहिवासी आहे. तो तीन वर्षांपूर्वी नागपुरात रोजगाराच्या शोधात आला. सध्या तो मॉ उमिया सोसायटीच्या एमआयडीसीत राहतो. तेथे तो एका आरामशीनवर काम करतो. त्याचा चुलत जावई आणि बहीणही तेथेच काम करतात आणि बाजूच्या झोपड्यात राहतात. ज्योती वाठोड्यातील भांडेवाडीजवळ राहायची. तीन महिन्यांपूर्वी तिचे ललितसोबत लग्न झाले.

लग्नानंतर काही दिवस चांगले गेल्यानंतर हे दोघे एकमेकांवर संशय घेऊन भांडू लागले. रात्री उशिरापर्यंत दोघेही मोबाईलमध्ये व्यस्त राहत होते आणि एकमेकांना टोमणे मारत होते. त्यांना त्यांच्या नातेवाइकांनी समजही दिली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री ११ च्या सुमारास नेहमीप्रमाणे ललित, ज्योती तसेच त्याची चुलत बहीण आणि जावई एकत्र जेवले. त्यानंतर ते बाजूच्या झोपड्यात झोपायला गेले.

सकाळी ८ वाजले तरी दोघांपैकी कुणीच घराबाहेर न आल्याने ललितची चुलत बहीण आणि जावयाने त्यांना आवाज दिला. प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ते झोपड्यात गेले असता ज्योती रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसली. त्यांनी आरडाओरड करून शेजाऱ्यांना गोळा केले. नंतर पारडी पोलिसांना कळविले. ठाणेदार सुनील गांगुर्डे आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहोचले. माहिती मिळताच पोलीस उपायुक्त लोहित मतानी, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुधीर नंदनवार यांनीही धाव घेतली.

लाकडी दांडक्याने डोक्यात फटके

आरोपी ललितने त्याच्या पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने फटके हाणून तिची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी काढला. बाजूलाच रक्ताने माखलेले दांडकेही पोलिसांनी जप्त केले. हत्या केल्यानंतर आरोपी ललित जबलपूर हायवेलगतच्या बहादुरा गावाकडे पळून गेला. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा माग काढून दुपारी ३ च्या सुमारास त्याला ताब्यात घेतले.

म्हणून केली हत्या

पत्नी रात्रंदिवस दुसऱ्यासोबत मोबाईलवर संपर्कात राहायची. तिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्याने तिला विचारणा केल्यानंतर ती मुजोरी करायची. म्हणून तिची हत्या केल्याचे आरोपीने प्राथमिक चाैकशीत पोलिसांना सांगितले आहे.

---

Web Title: The wife used to stay in touch with others on her mobile phone day and night; Murder committed by Husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून