पतीला वाईट म्हणणारी पत्नीच ठरली क्रूर
By admin | Published: June 27, 2016 02:54 AM2016-06-27T02:54:56+5:302016-06-27T02:54:56+5:30
विविध खोटे आरोप करून पतीला वाईट ठरविण्याचा प्रयत्न करणारी पत्नी स्वत:च क्रूर ठरली. यामुळे त्यांचे विवाह संबंध
राकेश घानोडे ल्ल नागपूर
विविध खोटे आरोप करून पतीला वाईट ठरविण्याचा प्रयत्न करणारी पत्नी स्वत:च क्रूर ठरली. यामुळे त्यांचे विवाह संबंध पुनर्स्थापित करण्याचा कुटुंब न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयात कायम राहू शकला नाही. उच्च न्यायालयाने पतीच्या विनंतीवरून हा वादग्रस्त निर्णय रद्द केला.
प्रकरणातील राहुल व कविता (काल्पनिक नावे) नागपूर येथील रहिवासी आहेत. त्यांनी २० आॅगस्ट २००२ रोजी लग्न केले होते. दोघांचेही हे दुसरे लग्न होते. राहुलचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झालाय तर, कविताच्या पहिल्या पतीचे निधन झाले आहे. राहुलला पहिल्या पत्नीपासून दोन मुले तर, कविताला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत. राहुलचा पहिल्या पत्नीसोबत १३ वर्षांनंतर घटस्फोट झाला होता. राहुल व कविताचे लग्नाच्या काही महिन्यानंतरच खटके उडायला लागले. संबंध विकोपाला गेल्यानंतर राहुल कविताला सोडून वेगळा राहायला लागला. राहुलला वेगळे होऊन तीन वर्षे झाल्यानंतर कविताने विवाह संबंध पुनर्स्थापित करण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. कुटुंब न्यायालयाने ही याचिका मंजूर केली. या निर्णयाविरुद्ध राहुलने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील दाखल केले होते. कविताने कुटुंब न्यायालयातील याचिकेत राहुलवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. त्यावरून राहुल फारच वाईट स्वभावाचा व विकृत मनोवृत्तीचा माणूस असल्याचे प्रतित होत होते. असे असतानाही कविता त्याच्यासोबत राहण्यास इच्छुक आहे ही बाब उच्च न्यायालयाला पटली नाही. उच्च न्यायालयाने कविताचे सर्व आरोप बिनबुडाचे ठरविले. राहुल एवढा वाईट असता तर त्याच्यासोबत राहण्याची कविताची इच्छाच नसती असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. राहुलने कविताच्या क्रूरतेसंदर्भात पुरावे सादर केले होते परिणामी न्यायालयाने राहुलचे अपील मंजूर करून कुटुंब न्यायालयाचा निर्णय रद्द केला. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व स्वप्ना जोशी यांनी हा निर्वाळा दिला.
असे होते पतीवरील आरोप
पतीने केवळ मालमत्तेसाठी माझ्यासोबत लग्न केले. प्रत्येक चार वर्षाने नवीन लग्न करण्याचा आपला व्यवसाय आहे असे पती सांगत होता. पती माझ्या मुलींचा मानसिक छळ करीत होता. तो मुलींची हत्या करण्याची धमकी देत होता. मला व मुलींना उपाशी ठेवत होता. पतीने सिलेंडरचे रेग्युलेटर काढून ठेवले होते इत्यादी गंभीर आरोप पत्नीने केले होते.