पत्नीचा श्वास थांबला, इतर रुग्णांचा थांबू नये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:07 AM2021-05-01T04:07:45+5:302021-05-01T04:07:45+5:30
भिवापूर : ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले म्हणून पत्नीला दवाखान्यात हलविले. मात्र, दवाखान्यातील मृत्यूच्या आकड्यांनी उडालेल्या थरकापामुळे ‘ती’ काहीसी बिथरत ...
भिवापूर : ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले म्हणून पत्नीला दवाखान्यात हलविले. मात्र, दवाखान्यातील मृत्यूच्या आकड्यांनी उडालेल्या थरकापामुळे ‘ती’ काहीसी बिथरत गेली. त्यामुळे सुटी घेऊन तिला गृहविलगीकरणात ठेवण्यात आले. त्यानंतर दोनच दिवसांत तिचे निधन झाले. पत्नीचा कायमचा थांबलेला श्वास कुटुंबीयांना धक्का देणारा होता. पत्नीप्रमाणे इतर गरजू रुग्णांचा श्वास थांबू नये. त्यांचा कोंडमारा होऊ नये. त्यांना ऑक्सिजन मिळावे. यासाठी पत्नी गेल्याचे दुख: झेलणाऱ्या पतीने दोन मोठे ऑक्सिजन सिलिंडर रुग्णांकरिता भेट दिले. शंकर खुजणारे, रा. उमरेड असे या दानदात्याचे नाव आहे. ते भिवापूर तहसील कार्यालयात मंडळ अधिकारी पदावर कार्यरत आहेत.
खुजणारे यांची पत्नी योगिता (४३) यांचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्यामुळे प्रारंभी भिवापूर व नंतर त्यांना नागपूर येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. येथे पाच- सहा दिवसांच्या उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. मात्र, दवाखान्यातील एकंदरीत वातावरणाने त्या घाबरल्या होत्या. त्यामुळे त्यांचे ऑक्सिजनचे प्रमाण वारंवार कमी होत होते. त्यामुळे कुटुंबीयांनी योगिताला गृहविलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पती शंकर यांनी आवश्यक औषधांसह ऑक्सिजनचे दोन मोठे सिलिंडर विकत घेतले. पत्नीवर घरीच उपचार सुरू केले. यादरम्यान २४ एप्रिल रोजी मध्यरात्री योगिताला हृदयविकाराचा धक्का आला आणि त्यातच तिचे निधन झाले. दोन मुलांसह पती शंकर यांच्यावर दुख:चा डोंगर कोसळला. कोरोना संसर्गात पत्नीचा नैसर्गिक श्वास ज्या प्रकारे कोंडला गेला. कृत्रिम श्वासोच्छ्वासाच्या बळावर तिने कोरोनाशी अखेरपर्यंत लढा दिला. मात्र, हृदयविकाराच्या धक्क्याने हा लढा अपयशी ठरला. पत्नीप्रमाणे इतर कोरोनाग्रस्तांचा श्वास कोंडू नये यासाठी पती शंकर यांनी कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी दोन मोठे ऑक्सिजन सिलिंडर भेट देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे गरजू रुग्णांना कृत्रिम का होईना श्वास घेण्यास मदत होणार आहे.
कोविड केअर सेंटरला भेट
शंकर खुजणारे यांनी शुक्रवारी स्थानिक कोविड केअर सेंटरला यातील एक मोठे ऑक्सिजन सिलिंडर भेट दिले. यावेळी तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. दर्शना गणवीर यांच्यासह खुजणारे कुटुंबीय उपस्थित होते. तर अन्य एक ऑक्सिजन सिलिंडर गृहविलगीकरणात असलेल्या परिचित रुग्णाला भेट देण्यात आले.
---
तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांच्या हस्ते कोविड केअर सेंटर ऑक्सिजन सिलिंडर भेट देताना खुजणारे कुटुंबीय.