नातेवाईकाच्या मयतीला का गेली, म्हणून पतीने ढकलल्याने पत्नीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2023 10:06 PM2023-06-08T22:06:14+5:302023-06-08T22:06:42+5:30
Nagpur News नातेवाईकाच्या मयतीला का गेली, असे म्हणून पत्नीला शिवीगाळ करून भांडणात तिला जमिनीवर ढकलल्यामुळे पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
नागपूर : नातेवाईकाच्या मयतीला का गेली, असे म्हणून पत्नीला शिवीगाळ करून भांडणात तिला जमिनीवर ढकलल्यामुळे पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सक्करदरा पोलिस ठाण्यांतर्गत सोमवारी क्वार्टर येथे घडली आहे. सक्करदरा पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कश्मा प्रशांत गोंडाणे (वय ४५, रा. क्वार्टर नं. १५०/०३ सोमवारी क्वार्टर) असे मृत महिलेचे नाव आहे. तर प्रशांत विठ्ठलराव गोंडाणे (वय ५५) असे आरोपी पतीचे नाव आहे. प्रशांतचे वेल्डींगचे दुकान आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून ते दोघेही शिक्षण घेत आहेत. कश्मा या १६ मे रोजी रात्री दहा वाजता नातेवाईकाचा मृत्यू झाल्यामुळे मयतीचा कार्यक्रम आटोपून घरी आल्या. त्यावर त्यांचे पती प्रशांत यांनी मयतीला का गेली, असे म्हणून त्यांना शिवीगाळ केली. त्यांच्यात झालेल्या भांडणात प्रशांतने कश्मा यांना ढकलल्याने त्या जमिनीवर पडल्या. तेवढ्यात कश्मा यांचा मुलगा आला आणि त्याने आईला सावरले. थोडावेळ बसल्यानंतर त्या बेशुद्ध झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी सुरुवातीला खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर मेडिकलच्या ट्रामा सेंटरमध्ये नेण्यात आले.
तेथे १८ मे रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. अकस्मात मृत्यूच्या चौकशीत तसेच मृत कश्मा यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या बयाणावरून व वैद्यकीय अहवालावरून आरोपी पती प्रशांत याने धक्का दिल्यामुळे खाली पडून बेशुद्ध झाल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या मृत्यूस आरोपी पती प्रशांत जबाबदार असल्यामुळे सक्करदराचे उपनिरीक्षक गंगाधर दहिलकर यांनी आरोपी पतीविरुद्ध कलम ३०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. वृत्त लिहिपर्यंत आरोपी पतीस अटक करण्यात आलेली नव्हती.
...............