पतीच्या अवयवदानासाठी पत्नीचा पुढाकार; दोन्ही मूत्रपिंडे, यकृताचे दान, तिघांना नवे आयुष्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2022 02:20 PM2022-12-05T14:20:02+5:302022-12-05T14:26:18+5:30

भंडाऱ्यातील व्यक्तीचे नागपुरात अवयवदान

Wife's initiative for husband's organ donation, new life for three by donating kidneys and liver | पतीच्या अवयवदानासाठी पत्नीचा पुढाकार; दोन्ही मूत्रपिंडे, यकृताचे दान, तिघांना नवे आयुष्य!

पतीच्या अवयवदानासाठी पत्नीचा पुढाकार; दोन्ही मूत्रपिंडे, यकृताचे दान, तिघांना नवे आयुष्य!

Next

नागपूर : अपघातात गंभीर जखमी झालेल्या ४० वर्षीय व्यक्तीवर उपचार सुरू असताना, डॉक्टरांच्या एका पथकाने रुग्ण ‘ब्रेन डेड’ झाल्याचे घोषित केले. कुटुंबावर शोककळा पसरली. त्या दु:खातही पत्नीसह कुटुंबातील इतर सदस्यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. या मानवतावादी निर्णयामुळे दोन्ही मूत्रपिंडे व यकृत दान करण्यात आले.

काटी, हरदोली, भंडारा येथील रहिवासी सहदेव धोंडू खंगार (४०) त्या अवयवदात्याचे नाव. प्राप्त माहितीनुसार, ३० नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता सहदेव आपल्या भावासोबत दुचाकीने खात गावाकडे जात असताना पिंपळगावजवळ अपघात झाला. सहदेव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने नागपूर ‘एम्स’ येथे दाखल केले. दोन दिवसांच्या उपचारानंतरही त्यांची प्रकृती खालावत गेली. १ डिसेंबर रोजी डॉक्टरांच्या पॅनेलने त्यांना ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदू मृत घोषित केले.

एम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार व डॉ.अश्विनी चौधरी यांनी त्यांचे समुपदेशन करीत अवयवदानाचे महत्त्व सांगितले. आपल्या माणसाला अवयवरूपी जिवंत ठेवण्यासाठी त्या दु:खातही त्यांच्या पत्नी सुनीता खंगार आणि पुतणे फुलचंद पुंडलिक राजुके यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. याची माहिती ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन सेंटर’च्या (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ.विभावरी दाणी व सचिव डॉ.संजय कोलते यांना देण्यात आली. यांच्या मार्गदर्शनात झोन समन्वयक वीणा वाठोरे यांनी पुढील प्रक्रिया हाती घेतली.

- ५१ वर्षीय रुग्णाला यकृताचे दान

खंगार यांच्याकडून प्राप्त झालेले यकृत न्यू इरा हॉस्पिटलमधील ५१ वर्षीय पुरुष रुग्णाला दान करण्यात आले. एक मूत्रपिंड किम्स किंग्सवे हॉस्पिटलमधील ९ वर्षीय मुलाला, तर दुसरे मूत्रपिंड एका खासगी हॉस्पिटलमधील ४७ वर्षीय पुरुष रुग्णाला दान करण्यात आले.

- आतापर्यंत ९३ अवयवदान

२०१३ पासून ‘ब्रेन डेड’ व्यक्तीकडून अवयवदान केले जात आहे. हे ९३वे अवयवदान होते, तर या वर्षातील हे ८वे अयवदान ठरले. अवयवदानाची गती वाढविण्यासाठी रुग्णालयातील ‘ब्रेन डेड’ रुग्णांचे समुपदेशन करून, त्यांना अवयवदानाचे महत्त्व सांगणे महत्त्वाचे असल्याचे डॉ. श्रीगिरीवार म्हणाले.

Web Title: Wife's initiative for husband's organ donation, new life for three by donating kidneys and liver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.