पत्नीचा खून, पतीस जन्मठेप

By admin | Published: October 1, 2015 03:11 AM2015-10-01T03:11:22+5:302015-10-01T03:11:22+5:30

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचशीलनगर झोपडपट्टीत पत्नीवर कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृणपणे खून करणाऱ्या आरोपी पतीला पहिले तदर्थ न्यायालयाचे .....

Wife's murder, husband's life imprisonment | पत्नीचा खून, पतीस जन्मठेप

पत्नीचा खून, पतीस जन्मठेप

Next

न्यायालय : एमआयडीसी भागातील प्रकरण
नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचशीलनगर झोपडपट्टीत पत्नीवर कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृणपणे खून करणाऱ्या आरोपी पतीला पहिले तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. दीक्षित यांच्या न्यायालयाने बुधवारी जन्मठेप आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
अब्दुल सईद शेख ऊर्फ अब्दुल शाहीद अब्दुल वहीद शेख (५१) असे आरोपीचे नाव असून, तो पंचशीलनगर झोपडपट्टीतील रहिवासी आहे. रमिझा, असे मृत महिलेचे नाव होते. ती अब्दुल सईदची पत्नी होती. खुनाची ही घटना ३ मे २०१४ रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली होती.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, रमिझा ही नेहमी रात्रीच्या वेळी आपला मुलगा साहिल याला सोबत घेऊन बहिणीकडे झोपायला जायची. घटनेच्या दिवशी रमिझासोबतच या प्रकरणातील फिर्यादी हलिमा, रेखाबाई आणि आरती ह्या वेगवेगळ्या खाटांवर झोपलेल्या होत्या. रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास आरोपी अब्दुल सईद हा तेथे गेला होता आणि पत्नीला घरी चलण्यास म्हणाला होता. रमिझाने सोबत येण्यास नकार देऊन सईदला घरी जाऊन झोपण्यास सांगितले होते. आरोपी सईद हा आपल्या घरी परत गेला होता आणि रात्री ११.३० वाजताच्या सुमारास हातात कुऱ्हाड घेऊन पत्नीकडे परत आला होता. त्याने रमिझाच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घातले होते. ती जागीच ठार झाली होती. अन्य लोकांनी सोडवण्याचा प्रयत्न केला असता सईद याने त्यांना धमकी दिली होती.
हलिमा शकील सय्यदच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी सईदला कुऱ्हाडीसह अटक केली होती. आरोपीविरुद्ध भादंविच्या ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेच्या दिवशी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास पती-पत्नीमध्ये सायकल विकण्यावरून भांडण झाले होते. या भांडणाचा राग धरून त्याने हा खून केला होता. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात १० साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन ही शिक्षा सुनावण्यात आली.
न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील मिलिंद पिंपळगावकर तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. भुरे यांनी काम पाहिले. हेड कॉन्स्टेबल पप्पू यादव, फाळके, नायक शिपाई किशोर ठाकरे आणि दिलीप यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: Wife's murder, husband's life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.