चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 09:59 PM2019-03-16T21:59:06+5:302019-03-16T21:59:15+5:30
चारित्र्याच्या संशयावरून एका तरुणाने त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केली. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयनगरात शुक्रवारी मध्यरात्री हा थरार घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चारित्र्याच्या संशयावरून एका तरुणाने त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केली. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयनगरात शुक्रवारी मध्यरात्री हा थरार घडला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी देवीदास ऊर्फ देवा बापूराव रंभाजी (वय ४०) याला अटक केली.
मृत महिला भावना देवा रंभाजी ऊर्फ धुर्वे हिच्यासोबत आरोपीचे दुसरे लग्न झालेले आहे. आरोपी देवीदास मूळचा चंद्रपूरचा रहिवासी होय. तो गेल्या काही वर्षांपासून जयनगरातील एनआयटी लेआऊटमध्ये मथुरा किराणा दुकानाजवळ कमलेश बोंबिलवारच्या घरी पहिल्या माळ्यावर भाड्याने राहत होता. आरोपी फिश फ्रायचा ठेला चालवायचा. तो संशयी स्वभावाचा होता. त्यामुळे त्याच्यासोबत भावनाचे नेहमीच खटके उडायचे. शुक्रवारी दिवसभरात देवीदासने भावनाला फोन केले. तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे देवीदासच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. ती दुसऱ्यासोबत कुठेतरी व्यस्त असावी, म्हणून फोनला प्रतिसाद देत नसेल, असे वाटल्याने तो संतापला. रात्री उशिरा घरी परतल्यानंतर त्याने भावनासोबत वाद सुरू केला. तू फोन का उचलला नाही, तू कुणासोबत कुठे होती, असे विचारत तो भावनावर उलटसुलट आरोप लावू लागला. त्यामुळे भावनाने त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले. परिणामी दोघांमधील वाद वाढतच गेला. मध्यरात्री पुन्हा या वादाचे स्वरूप तीव्र झाले. संतप्त झालेल्या देवीदासने स्वयंपाक घरातील लाकडी मूठ असलेला लोखंडी तवा उचलून भावनाच्या डोक्यावर मारला. एकाच फटक्यात भावनाचे डोके फुटून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. ती खाली कोसळताच आरोपी तेथून पळून गेला. दरम्यान, आरडाओरड ऐकून घरमालक कमलेश बोंबिलवार (वय ३४) पहिल्या माळ्यावर पोहचले. त्यांनी भावना रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडून दिसल्याने लगेच अंबाझरी पोलिसांना कळविले. पोलीस घटनास्थळी पोहचले. भावनाला डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, बोंबिलवारच्या तक्रारीवरून पोलिसांनी देवीदासविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. फरार झालेल्या आरोपी देवीदास रंभाजीला पोलिसांनी आज पहाटे अटक केली.