पतीला जगविण्यासाठी पत्नीची धडपड
By admin | Published: June 11, 2017 02:37 AM2017-06-11T02:37:47+5:302017-06-11T02:37:47+5:30
मुख कर्करोग झालेल्या पतीला वाचविण्यासाठी पत्नीने नातेवाईकांकडून उसनवारी घेऊन उपचार सुरू केले.
पतीचा कर्करोगाशी संघर्ष : नंदनवार कुटुंबाला हवे जगण्याचे बळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख कर्करोग झालेल्या पतीला वाचविण्यासाठी पत्नीने नातेवाईकांकडून उसनवारी घेऊन उपचार सुरू केले. पैसे कमी पडत असल्याचे पाहत दागिनेही विकले. आता हातचे संपले. पतीला वाचविण्यासाठी किमोथेरपी, रेडिएशन व शस्त्रक्रियेची गरज आहे. यासाठी चार ते पाच लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. भाड्याचे घर, चार छोटी मुले आणि एका खासगी कंपनीत चार हजाराच्या वेतनात पतीवर उपचार करण्याची पत्नीची परिस्थिती नाही. पतीला जगवावे तरी कसे, या चिंतेने या गरीब कुटुंबाचे जीणे हराम झाले आहे. या कुटुंबाला संवेदनशील समाजाच्या भरीव आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.
पतीच्या उपचारासाठी काही करण्याची जिद्द बाळगून असलेली विद्या विकास नंदनवार त्या पत्नीचे नाव. जुनी शुक्रवारी तेलीपुरा येथील अशोक तराळे यांच्या घरी त्या भाड्याने राहतात. विद्याचे पती विकास हे घर पेंटिंगचे कामे करायचे तर विद्या एका खासगी कंपनीत चार हजार रुपयांच्या वेतनावर नोकरीला आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये विकासच्या तोंडात लाल चट्टा आढळून आला. विद्याने विकासला मेडिकलमध्ये नेले. विविध तपासण्यानंतर विकासला मुखाचा कर्करोग असल्याचे निदान झाले. या गरीब कुटुंबावर कुऱ्हाडच कोसळली. पतीवर उपचार करण्यासाठी पत्नीची धडपड सुरू झाली. परंतु उपचाराचा खर्च वाढतच असल्याने तिचे सर्व प्रयत्न थिटे पडले. किमोथेरपी, रेडिएशन व शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांनी चार-पाच लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले.
कॅन्सरमुळे गाल सडला
‘लोकमत’शी बोलताना विद्या नंदनवार म्हणाल्या, पतीचा कॅन्सर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यातच एका भागातील गाल सडला. त्यातून दात दिसू लागले आहेत. सडलेल्या गालामधून किडे बाहेर पडण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. घरी अडीच वर्षाचा मुलगा आहे, तीन मुली आहेत. मोठी मुलगी १२ वर्षांची आहे. यांच्या भरवशावर घर सोडून कामाला जाते. चार हजाराच्या नोकरीत घराचे भाडे, पतीवरील उपचार व मुलांचे पोट भरणे कठीण झाले आहे. समाजाचे आर्थिक पाठबळ मिळाल्यास पती वाचेल, घराला मोठा आधार मिळेल ही एकमेव आशा आहे, असेही त्या म्हणाल्या.
हवा माणुसकीचा धर्म
नंदनवार यांचा आता कुठे संसार फुलला होता. परंतु नियतीचे चक्र फिरले आणि काही कळण्याच्या आतच कठोर आघात सोसण्याची वेळ या गरीब कुटुंबावर आली. त्याना गरज आहे ती समाजाच्या मदतीच्या हाताची. हीच मदत या कुटुंबाला पुन्हा एकदा लढण्याचे बळ-जगण्याची उभारी देऊ शकते. विद्या विकास नंदनवार यांना मदत करू इच्छिणाऱ्यांनी बँक आॅफ महाराष्ट्र, शाखा नंदनवन ले-आऊट येथील अकाऊंट नंबर ६००३४९१५३२१, आयएफएससी कोड: एमएएचबी ००००६६५ यावर धनादेश अथवा धनाकर्ष पाठवून मदत करावी. नंदनवार यांना ९०७५१६२३९० या क्रमांकावर संपर्क साधता येईल.