डुक्कर आडवे गेले अन् घडला भीषण अपघात : भरधाव कार ट्रकवर आदळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:15 AM2019-07-12T00:15:13+5:302019-07-12T00:20:20+5:30
डुक्कर मध्येच आडवे गेल्याने चालकाचा वेगात असलेल्या कारवरील ताबा सुटला आणि अनियंत्रित कार रोडवरील ट्रकवर मागून धडकली. त्यात दोघांचा मृत्यू झाला असून, चौघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - जबलपूर महामार्ग क्रमांक - ७ वरील पवनी शिवारात बुधवारी रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (देवलापार) : डुक्कर मध्येच आडवे गेल्याने चालकाचा वेगात असलेल्या कारवरील ताबा सुटला आणि अनियंत्रित कार रोडवरील ट्रकवर मागून धडकली. त्यात दोघांचा मृत्यू झाला असून, चौघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - जबलपूर महामार्ग क्रमांक - ७ वरील पवनी शिवारात बुधवारी रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास घडली.
रामकिशन देवीलाल डहरवाल (५२) व काव्यसिंग अजय डहरवाल (३ महिने) अशी मृतांची तर रोशनी अजय डहरवाल (२५), दीप्ती गोविंद डहरवाल, गोविंद डहरवाल व पिहू गोविंद डहरवाल, सर्व रा. जिल्हापूर, ता. कुरई, जिल्हा शिवनी, मध्य प्रदेश अशी जखमींची नावे आहेत. काव्यसिंग हा आजारी असल्याने हे सर्व जण त्याच्या उपचारासाठी एमएच-४९/एएस-३७४९ क्रमांकाच्या कारने नागपूरला जात होते. या मार्गावरील पवनी शिवारात असलेल्या चिंदई माता मंदिराजवळ कारला डुक्कर आडवे गेले. त्यामुळे चालक अशफाक शब्बीर खान याचा कारवरील ताबा सुटला आणि अनियंत्रित कार समोर असलेल्या ट्रकवर मागून धडकली.
त्यात कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला असून, कारमधील काव्यसिंग व रामकिशन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शिवाय, अन्य चौघे गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले व जखमींसह मृतदेह देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे जखमींवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नागपूरला रवाना केले. शिवाय, दोन्ही मृतदेहांवर उत्तरीय तपासणी करून ते कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणी देवलापार पोलिसांनी कारचालक अशफाक याच्या विरुद्ध भादंवि २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.