विद्यार्थ्यांनी पटवून दिले रानभाज्यांचे महत्त्व, तयार केले विविध प्रकारचे पदार्थ
By आनंद डेकाटे | Published: July 21, 2023 05:06 PM2023-07-21T17:06:00+5:302023-07-21T17:06:31+5:30
नागपूर विद्यापीठात रानभाजी महोत्सव
नागपूर : आपल्या सभोवताल आढळणाऱ्या रानभाज्यांमध्ये विविध प्रकारचे औषधीय गुण आढळून येते. रानभाज्यांचे पावडर करीत कॅप्सूल स्वरूपात अत्यंत महागड्या दरांमध्ये विक्री केली जाते. मात्र त्या ऐवजी नैसर्गिक रानभाज्यांचे सेवन केल्यास फायदेशीर ठरते. रानभाज्यांचे हेच महत्तव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूरविद्यापीठातील गृहविज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांनी पटवून दिले. निमित्त हाेते. रानभाजी महोत्सवाचे. शुक्रवारी आयोजित या महोत्सवात स्वत: विद्यार्थ्यांनी अत्यंत मेहनतीने या रानभाज्यांपासून विविध प्रकारचे पदार्थ तयार केले होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव वर्षाच्या निमित्ताने गृहविज्ञान विभागात शुक्रवारी रानभाजी एक्स्पोचे आयोजन करण्यात आले. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. गृहविज्ञान विभागाच्या सभागृहात आयोजित महोत्सवात एकूण २७ रानभाज्यांचे महत्त्व विषद करणारे स्टॉल्स लावण्यात आले होते. ताज्या भाज्या, सुकवलेल्या भाज्या, पावडर, त्याचे विविध प्रकारचे पदार्थ, चटण्या, उत्तप्पा, भाकर, पोळी आदी वस्तू प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या.
तरोटा, खापरखुटी, पातूर, अरदफरी, चिंचेचे पान, शेवगा, आघाडा, लाल भाजी, चिवळ, मुळ्याची पाने, फुलगोभीची पाने, घोळभाजी, तांदुजा अशा विविध वनस्पतींचा समावेश होता. यावेळी प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, गृह विज्ञान प्रमुख डॉ. कल्पना जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.
- रानभाज्यांमधील रोगप्रतिकारक पोषकतत्व संशोधनातून शोधून काढा
विविध आजारांवर रामबाण असलेल्या रानभाज्यांमधील रोगप्रतिकारक पोषकतत्व संशोधनातून शोधून काढा, असे आवाहन कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी प्रदर्शनाची पाहणी करताना केले.