सोलरपंप व टॅँकरच्या मदतीने भागविणार वन्यजीवांची तृष्णा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 10:47 AM2018-04-10T10:47:50+5:302018-04-10T10:48:01+5:30

पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पेंच, बोर प्रकल्प, उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य तसेच पांढरकवडा परिसरातील वन्यप्राण्यांना उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये म्हणून वनविभागाने हिट अ‍ॅक्शन प्लॅन राबविला आहे.

Wildlife get water with the help of solar pumps and tankers | सोलरपंप व टॅँकरच्या मदतीने भागविणार वन्यजीवांची तृष्णा

सोलरपंप व टॅँकरच्या मदतीने भागविणार वन्यजीवांची तृष्णा

Next
ठळक मुद्दे५२९ पाणवठ्यांवर पुरवठावन विभागाचा ‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पेंच, बोर प्रकल्प, उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य तसेच पांढरकवडा परिसरातील वन्यप्राण्यांना उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये म्हणून वनविभागाने हिट अ‍ॅक्शन प्लॅन राबविला आहे. या क्षेत्रात १७९ नैसर्गिक पाणवठे आहेत व ३५० कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. उन्हाळ्यात हे पाणवठे कोरडे पडू नये, यासाठी सोलरपंप आणि टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
वनविभागातर्फे संरक्षित वनक्षेत्रात प्राण्यांसाठी उपलब्ध पाण्याच्या स्रोतांचा आढावा घेण्यात आला. पेंच व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक आर.एस. गोवेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात १७९ नैसर्गिक व ३५० कृ त्रिम पाणवठ्यांची संख्या आहे. नैसर्गिक जलसाठ्यांपैकी ७६ साठ्यांमध्ये बारमाही पाणी उपलब्ध राहील तर ६२ पाणवठ्यांवर एप्रिल अखेरपर्यंत आणि १६ पाणवठ्यांवर मे अखेरपर्यंत पाणी उपलब्ध राहणार, असा दावा विभागाने केला आहे.
वनविभागाने तयार करण्यात आलेल्या पाणवठ्यांमध्ये १२३ पाणवठ्यांवर सोलरपंपद्वारे पाणीपुरवठा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. संरक्षित क्षेत्रात असलेल्या ३१ बोअरवेलवर सोलरपंप लावण्यात आले आहेत. दरम्यान यामधील अनेक सोलरपंप नादुरुस्त असून त्यांच्या दुरुस्तीचे काम प्रस्तावित असल्याचे विभागाने नमूद केले आहे. १९ पाणवठ्यावर हॅन्डपंपद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
उर्वरित १९८ कृत्रिम पाणवठ्यांपैकी ६१ पाणवठ्यांवर तीन शासकीय टॅँकरद्वारे तर १३७ पाणवठ्यांवर भाड्याने घेतलेल्या ७ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. एप्रिल ते जून महिन्याच्या कालावधीत कोरडे पडणारे कृत्रिम पाणवठे भरण्यासाठी आणखी २० टॅँकरची आवश्यकता भासणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. एप्रिल महिनाअखेर काही नैसर्गिक पाणवठे कोरडे पडण्याची शक्यता असल्याने त्यांच्या आसपासचे कृत्रिम पाणवठे पाण्याने भरण्याची व्यवस्था करण्यात येईल, अशी माहितीविभागाने दिली. २०१७-१८ या वर्षात पाणवठे भरण्याकरिता झालेल्या खर्चापेक्षा यावर्षी अधिक खर्च लागणार असल्याचेही वनविभागाने नमूद केले आहे.
प्राणी नैसर्गिक साठ्यांचा वापर अधिक करतात
वनविभागातर्फे कृत्रिम पाणवठ्यांवर करण्यात येत असलेली व्यवस्था स्वागतार्ह आहे. मात्र निरीक्षणानुसार वन्यप्राणी तहान भागविण्यासाठी नैसर्गिक पाणवठ्यांचा वापर अधिक करीत असल्याचे वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे. त्यामुळे वनविभागाने नैसर्गिक जलसाठ्यांकडे लक्ष देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्राण्यांचा अधिक ओढा असलेल्या नेमक्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करावी तसेच नैसर्गिक जलसाठ्यांच्या खोदकामासाठी अवैज्ञानिक पद्धतीचा वापर करू नये, अशी अपेक्षा वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केली.

Web Title: Wildlife get water with the help of solar pumps and tankers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.