वन्यप्राण्यांच्या अधिवासाचे जतन व्हावे
By Admin | Published: October 3, 2015 03:03 AM2015-10-03T03:03:37+5:302015-10-03T03:03:37+5:30
मानवासाठी जंगल व वन्यजीवांचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या संरक्षणासह वन्यजीवांच्या अधिवासाचे जतन व्हावे,
वन्यजीव सप्ताहाचे उद्घाटन : वनबल प्रमुख यांचे आवाहन
नागपूर : मानवासाठी जंगल व वन्यजीवांचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या संरक्षणासह वन्यजीवांच्या अधिवासाचे जतन व्हावे, असे आवाहन राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) ए. के. निगम यांनी केले.
सेमिनरी हिल्स येथील वन सभागृहात गुरुवारी ‘वन्यजीव सप्ताहा’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला अतिथी म्हणून प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सर्जन भगत व ज्येष्ठ वन्यजीवप्रेमी गोपाल ठोसर उपस्थित होते.
निगम पुढे म्हणाले, वनसंरक्षणात लोकांचा सहभाग आवश्यक आहे. वन विभागाने जंगल व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी पोलीस विभागाप्रमाणे विशेष व्याघ्र संरक्षण दल (एसटीपीएफ) तयार केले आहे. याशिवाय लोकांमध्ये वन्यप्राण्यांविषयी जनजागृती व्हावी, यासाठी व्याघ्रदूत म्हणून अभिनेते अमिताभ बच्चन व सचिन तेंडुलकर यांची मदत घेतली जात आहे. तसेच राज्यातील व्याघ्र प्रकल्पांना जागतिकस्तरावर पोहोचविण्यासाठी काम केले जाणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी पाहुण्यांच्या हस्ते ‘वन विभागाची यशोगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच वन सभागृहाच्या गॅलरीत एका खास चित्र प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)