अडकून पडलेले मजूर, पर्यटक, विद्यार्थी यांचे ‘ऑनलाईन’ अर्ज स्वीकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 09:37 PM2020-04-30T21:37:30+5:302020-04-30T21:37:52+5:30
लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या राज्यात अथवा परराज्यातील मजूर, पर्यटक, विद्यार्थी आदींना त्यांच्या जिल्ह्यात, गावी परत जाण्यासाठी काही अटीवर मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, यासाठी ‘ऑनलाईन’ अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या राज्यात अथवा परराज्यातील मजूर, पर्यटक, विद्यार्थी आदींना त्यांच्या जिल्ह्यात, गावी परत जाण्यासाठी काही अटीवर मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, यासाठी ‘ऑनलाईन’ अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे. प्रशासनाच्या शेल्टर होममध्ये असलेल्यांना मात्र अर्ज करण्याची गरज नाही, त्यांची संपूर्ण माहिती प्रशासनाकडे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
लॉकडाऊनमुळे राज्यात आणि परराज्यात अडकून पडलेले असल्यामुळे त्यांना त्यांच्या मूळ निवासाच्या ठिकाणी जाण्यासाठी शासनाने काही अटीवर परवानगी दिली आहे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या nagpur.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज विहीत नमुन्यात सादर करणे आवश्यक आहे, अर्ज जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी याचे नावे सादर करणे आवश्यक आहे. अर्ज करताना स्वत:चे वाहन अथवा शासकीय सुविधा, संपूर्ण पत्ता, आधार क्रमांक, दूरध्वनी, कुठे जायचे आहे, किती व्यक्ती सोबत आहे, त्याचा तपशील सादर करणे आवश्यक आहे.
नागपूर जिल्ह्यातील व्यक्तींना राज्यातील इतर जिल्ह्यात किंवा इतर राज्यातील जिल्ह्यामध्ये जावयाचे असल्या सुविधा उपलब्ध आहे, त्यासाठी इतर जिल्ह्यात किंवा परराज्यात कोरोनामुळे वाहतूक प्रतिबंधात्मक कार्यवाहीमुळे अडकून पडलेल्या जिल्ह्यातील राहिवाशांनी त्याचे निवासस्थानी परत येण्यासाठी ऑनलाईन विहीत नमुन्यातील अर्ज करणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.