‘अल्-निनाे’ देईल का शेतीला दगा? मान्सूनचे उशिरा आगमन झाल्यास पावसाचे दिवस कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2023 08:00 AM2023-04-21T08:00:00+5:302023-04-21T08:00:01+5:30

Nagpur News परदेशी एजन्सीनुसार येत्या पावसाळ्यात ‘अल्-निनाे’ची सक्रियता ८० टक्क्यांनी वाढली आहे आणि ‘इंडियन ओशन डायपाेल’ म्हणजे ‘आयओडी’चा भराेसा जर-तरवर अवलंबून आहे. त्यामुळे यंदा पाऊस शेतीला दगा देईल का, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Will 'Al-Nina' betray agriculture? If the monsoon arrives late, the rainy days will be less | ‘अल्-निनाे’ देईल का शेतीला दगा? मान्सूनचे उशिरा आगमन झाल्यास पावसाचे दिवस कमी

‘अल्-निनाे’ देईल का शेतीला दगा? मान्सूनचे उशिरा आगमन झाल्यास पावसाचे दिवस कमी

googlenewsNext

निशांत वानखेडे

नागपूर : यंदा ‘अल्-निनाे’च्या सक्रियतेमुळे पावसावर विपरीत प्रभाव हाेण्याच्या शक्यतेत देशात ९० ते ९५ टक्के म्हणजे सरासरीच्या जवळपास पाऊस हाेण्याची शक्यता नुकतीच हवामान विभागाने व्यक्त केली हाेती. हा भराेसा भारतीय महासागरीय माेसमी पावसामुळे दिला जात आहे; मात्र परदेशी एजन्सीनुसार येत्या पावसाळ्यात ‘अल्-निनाे’ची सक्रियता ८० टक्क्यांनी वाढली आहे आणि ‘इंडियन ओशन डायपाेल’ म्हणजे ‘आयओडी’चा भराेसा जर-तरवर अवलंबून आहे. त्यामुळे यंदा पाऊस शेतीला दगा देईल का, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

भारतीय मान्सून दाेन घटकांवर अवलंबून असते. पॅसिफिक महासागराच्या पाण्याच्या तापमानावरून अधिक पावसासाठी ‘लाॅ-निनाे’ व कमी पावसासाठी ‘अल्-निनाे’चा प्रभाव कारणीभूत ठरताे; मात्र भारतात मान्सूनसाठी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील तापमानाच्या घडामाेडी कारणीभूत ठरतात. याच घटकाच्या भरवशावर हवामान विभागाने ‘अल्-निनाे’चा प्रभाव असूनही सरासरी इतक्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. जेव्हा अरबी समुद्रातील तापमान बंगालच्या खाडीपेक्षा अधिक असते तेव्हा पावसाची स्थिती अनुकूल असते आणि उलट झाले तर प्रतिकूल असते.

पावसाचे दिवस घटतील का?

हवामान विभागाचे निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले, यंदा अल्-निनाे जुलै ते ऑगस्टमध्ये सक्रिय हाेण्याची शक्यता परदेशी हवामान एजन्सींनी वर्तविली आहे. विशेष म्हणजे, याच काळात माेसमी पाऊस अधिक असताे. यावेळी अल्-निनाे सक्रिय झाला तर पावसावर परिणाम हाेईल. गेल्या काही वर्षांत मान्सूनचे आगमन उशिरा हाेत आहे. यावेळीही असे झाले तर पावसाचे दिवस घटण्याची शक्यता आहे. ‘भारतीय महासागरीय द्वि-ध्रुविता’ म्हणजे इंडियन ओशन डायपाेल (आयओडी) लवकर विकसित झाला तर परिस्थिती अनुकूल ठरेल; मात्र बऱ्याच वेळा आयओडी हंगामाच्या उत्तरार्धात अवतरला आहे. असे झाले तर चिंता वाढण्याची शक्यता खुळे यांनी व्यक्त केली.

२० वर्षांत ७ वेळा दुष्काळी स्थिती

परदेशी एजन्सीनुसार येणाऱ्या पावसाळ्यात अल्-निनोची शक्यता ८० टक्के वाढली आहे. म्हणजेच अल्-निनोमुळे पावसाची शक्यता देशात सरासरीपेक्षा कमी असू शकते. तज्ज्ञांच्या मते अल्-निनो वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. २००१ ते २०२० अशा २० वर्षांत २००३, २००५, २००९, २०१०, २०१५, २०१६, २०१७ अशा ७ वर्षांत सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊन दुष्काळी स्थितीला सामोरे जावे लागले. या ७ वर्षांत खरिपात पिकांना झळ बसून उत्पादन कमी झाले आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती असेल?

हवामान विभागाच्या भाकितानुसार महाराष्ट्रात जर तो सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९० ते ९५ टक्के पडण्याचीच शक्यता वर्तविली आहे. कमकुवत मान्सूनचा रेटा राज्यातही राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शेतीसाठी दुष्काळसदृश परिस्थितीची शक्यताही नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगत परिस्थिती पाहून कमी पाऊस लागणाऱ्या पिकांची लागवड करावी, असे आवाहन माणिकराव खुळे यांनी केले आहे. शिवाय पाण्याचा काटकसरीने वापर करून जलस्रोत आपत्ती स्थितीसाठी राखीव ठेवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Will 'Al-Nina' betray agriculture? If the monsoon arrives late, the rainy days will be less

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :weatherहवामान