अमित शहा १९ तारखेलाच नागपुरात येणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:56 AM2019-01-16T00:56:05+5:302019-01-16T00:57:20+5:30
१८ ते २० जानेवारी या कालावधीत भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय महाधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहा हे १९ तारखेलाच नागपुरात येण्याची शक्यता असून त्याच दिवशी सभा होऊ शकते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १८ ते २० जानेवारी या कालावधीत भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय महाधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहा हे १९ तारखेलाच नागपुरात येण्याची शक्यता असून त्याच दिवशी सभा होऊ शकते.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या महाधिवेशनाला महत्त्व आले आहे. अधिवेशनात ४ हजारहून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सोबतच १३ केंद्रीय मंत्री व विविध राज्यांतील मंत्री, राज्यमंत्री मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सामाजिक न्याय राज्यमंत्री विजय सांपला, केंद्रीय जलसंपदा राज्यमंत्री अर्जुन मेघवाल महाधिवेशनात मार्गदर्शन करतील. नियोजित वेळापत्रकानुसार अमित शहा यांची सभा २० जानेवारी रोजी कस्तूरचंद पार्क येथे होणार आहे. मात्र काही पक्ष मुख्यालयात त्याच दिवशी काही महत्त्वाच्या बैठकादेखील असल्याने शहा हे १९ जानेवारी रोजी येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरून कळविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपचे शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे यांना विचारणा केली असता अमित शहा यांची सभा १९ जानेवारी होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. याची रुपरेषा लवकरच निश्चित होईल असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शहर भाजपानेदेखील महाधिवेशनाची युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. सातत्याने बैठकादेखील सुरू आहेत. डॉ.वसंतराव देशपांडे सभागृह परिसरात अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून तेथे भव्य मंडप उभारण्यात येणार आहे. याचे भूमिपूजन मंगळवारी करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष सुधाकर कोहळे, महापौर नंदा जिचकार उपस्थित होते. यावेळी आ.मिलिंद माने, अनुसूचित जाती मोर्चाचेराष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक मेंढे,विदर्भ संघटन मंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी, अनुसूचित जाती मोर्चाचे शहर अध्यक्ष धर्मपाल मेश्राम, महामंत्री संदीप जाधव, किशोर पलांदुरकर, भोजराज डुंबे, डॉ. कीर्तिदा अजमेरा, अर्चना डेहनकर, प्रगती पाटील, दिव्या धुरडे, दयाशंकर तिवारी इत्यादी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.