आज कुणी कृष्ण बनेल का, कालियाचे मर्दन करेल का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 12:00 AM2019-10-06T00:00:03+5:302019-10-06T00:05:23+5:30
‘नागपूर दुर्गा उत्सव २०१९’मध्ये शनिवारी शरयू नृत्य कला मंदिरतर्फे ‘हे नदे... सरिते : दी अनटोल्ड स्टोरी’ भावनृत्यनाटिकेचे अप्रतिम असे सादरीकरण झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सृष्टी संरक्षणासाठी भगिरथ प्रयत्नातून महादेवाने जटेत धारण करीत गंगेला पृथ्वीवर अलगद सोडले आणि सरितासृष्टीचा नव्याने जन्म झाला. तेव्हापासून ते आजपर्यंतचा सुरेल, लयकारी, अवखळ प्रवास नृत्याभिनयातून अलहिदा सादर झाला. जणू श्रोतृवृंदाने अनायसे त्या प्रवासात स्वत:ला झोकून दिले. या प्रवासात ‘हे नदे... सरिते, तुझा त्रिवार जयजयकार’ असा अव्यक्त भाव मनामनातून व्यक्त होत होता.
लोकमत आणि राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने पूर्व लक्ष्मीनगर येथील व्हॉलिबॉल क्रीडांगणात सुरू असलेल्या ‘नागपूर दुर्गा उत्सव २०१९’मध्ये शनिवारी शरयू नृत्य कला मंदिरतर्फे ‘हे नदे... सरिते : दी अनटोल्ड स्टोरी’ भावनृत्यनाटिकेचे अप्रतिम असे सादरीकरण झाले. कथ्थक नृत्य साधिका सोनिया परचुरे यांची संकल्पना आणि लेखनातून आकाराला आलेल्या या भावनृत्यनाटिकेचे निवेदन प्रख्यात अभिनेत्री रेणुका शहाणे यांचे आहे. ‘गंगा सिंधू सरस्वतीच यमुना’ या मंगलाष्टकातील सरितावंदनाने सुरू झालेल्या या नृत्याविष्कारातून महादेव शिव, श्रीकृष्ण, नर्मदा-शोण-जोहिल्या प्रणय प्रसंग, श्रीराम-गोदावरी आदी प्रसंगातून सरितासृष्टीचा प्रवास हृदयाला भिडेल अशातºहेने सादर झाला. यातून वर्तमान वैश्विक प्रदूषणाचा मुद्दादेखील अधोरेखित करीत महाभारतातील ‘कालिया मर्दन’शी लीलया जोडण्यात आला. ‘जागो रे राजकुमार, जमूना में गेंद डालो’ या सुरेख गीतावरील नृत्याभिनयातून वर्तमान नदी प्रदूषणाची भयंकर अशा स्थितीला अंकित करण्यात आले. द्वापर युगात कालियाच्या वास्तव्याने आणि त्याच्या विष फुत्कारणातून यमुना नदी प्रदूषित झाली होती. त्या प्रदूषणापासून मुक्ती मिळविण्यासाठी बाल कृष्णाने मुद्दामहून चेंडू यमुनेत टाकला आणि चेंडू काढण्याच्या बहाण्याने कालियाचे मर्दन करीत यमुनेला मुक्त केले. वर्तमानात कारखानदारी म्हणजेच कालिया. त्याच्या मर्दनासाठी कुणीतरी कृष्ण बनावा आणि चेंडू यमुनेत टाकावा.. अशी आर्त हाक यावेळी करण्यात आली.
यासोबतच नदीच्या सुकुमार तरल भावनेचे वर्ण प्रेयसी-प्रियकर या उदाहरणातून करण्यात आले. प्रेयसी नदी जेव्हा वळणावळणातून नखरेल वाहते तेव्हा ती प्रियकर सूर्यदेवाला रिझविण्याचा प्रयत्न करते. अशात सूर्यदेवाचा संदेशवाहक असलेला सूर्यफूल दोघांमधील दुवा ठरतो. सूर्यदेवाचा संदेश मिळताच हर्षोल्लासिक होऊन नदी बाष्प उधळते आणि सूर्यातपाचा स्पर्श होताच त्या बाष्पाचे मेघगर्जनेत रूपांतरण होऊन वर्षाऋतू सुरू होतो. अशा मेघनेचे वेगवेगळ्या उदाहरणांतून वर्णनात्मक प्रवास सुखावणारा होता.
वृद्धाश्रमातील ज्येष्ठांचा सन्मान
या कार्यक्रमासाठी मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना विशेषत्वाने आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांचा सन्मान करण्यात आला. या ज्येष्ठ नागरिकांच्याच हस्ते दुर्गामातेची आरती करण्यात आली.