स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर तुकाराम मुंढे पदावर राहणार की नाही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 09:02 AM2020-07-10T09:02:09+5:302020-07-10T09:07:02+5:30
आज शुक्रवारी स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत मुंढे पदावर राहणार की नाही. यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर स्मार्ट अॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाली नसतानाही त्यांनी हे पद बळकावल्याचा मनपातील सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे. मागील काही दिवसापासून यावरून वाद सुरू असताना आज शुक्रवारी स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत मुंढे पदावर राहणार की नाही. यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
मनपातील सत्ताधारी भाजपचा आयुक्त मुंढे यांची ‘सीईओ’ पदावर नियुक्ती करण्याला विरोध आहे. त्यामुळे, संचालक मंडळातील इतर संचालकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीच्या विषय पत्रिकेत ‘सीईओ’ पदी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याही नियुक्तीचा प्रस्ताव आहे. दरम्यान महापौर संदीप जोशी आणि सत्ता पक्षनेता संदीप जाधव यांनी संचालक मंडळाच्या इतर संचालकांना पत्र पाठवून कायद्याच्या अधीन राहून निर्णय घ्यावा, असे आवाहन केले आहे. तिकडे बैठकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त मुंढे यांनीही अधिकाºयांची बैठक घेऊन तयारी केली आहे. महापालिकेतील आयुक्त विरुद्ध सत्ताधारी असा संघर्ष टोकाला गेला आहे.
सत्तापक्षाकडून सलग आयुक्तांच्या कारभारावर आक्षेप घेतले जात आहे. स्मार्ट सिटीचे ‘सीईओ’ नसताना आयुक्तांनी या पदाचे अधिकार वापरले. २० कोटींची देयके चुकवल्याचेही सत्तापक्षाकडून आरोप झाले. दरम्यान, महापौर संदीप जोशी यांनी आयुक्त मुंढे यांच्या स्मार्ट सिटीच्या गैरकारभाराची चौकशी व्हावी, अशी याचिका न्यायालयात दाखल केली आहे. परंतु, आयुक्तांनी केलेल्या कामांचे राज्य शासनाकडून कौतूकही केले जात आहे. अशा संघर्षात आता ‘सीईओ’पदाकरिता संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.