‘साई’च्या प्रस्तावित जागेतील वादग्रस्त भागाची मोजणी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:08 AM2021-05-26T04:08:24+5:302021-05-26T04:08:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पूर्व नागपुरातील मौजा वाठोडा, तरोडी(खुर्द) परिसरात राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्व नागपुरातील मौजा वाठोडा, तरोडी(खुर्द) परिसरात राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी नागपूर महापालिकेने भारतीय क्रीडा प्राधिकरणला(साई) १४०.७७ एकर जमीन ३० वर्षांसाठी लीजवर दिली आहे. यातील ८७.२३ एकर जागेचा आगाऊ ताबा ‘साई’ला देण्यात आला आहे. मात्र यातील ६.७६ एकर जमिनीवर महापालिकेचा ताबा नाही. सातबारावर नाव असलेल्या मूळ जमीनमालकांकडून जमीन विकत घेऊन लेआऊटधारकांनी येथील प्लाट विकले. लोकांनी येथे घरे उभारली. आता महापालिका या अशा जागेची मोजणी करून भूसंपादन करण्याच्या प्रयत्नात आहे. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे; परंतु यामुळे वाठोडा व तरोडी परिसरातील नागरिकांत ख्ळबळ उडाली आहे.
या प्रकल्पासाठी मौजा वाठोडा येथील २८.४६ एकर व तरोडी खुर्द येथील ११२.२९ एकर जमीन प्रस्तावित आहे. सन १९५९-६० मध्ये नागपूर सुधार प्रन्यासने मौजा तरोडी खुर्द व मौजा बिडगाव येथील ४५५.८६ एकर जागा अवॉर्डद्वारे सिवरेज प्रकल्पासाठी संपादित केली होती. त्यानंतर कृषी विभागाने १९६९ मध्ये ही जमीन महापालिकेला हस्तांतरित केली.. मात्र मागील ४० ते ४५ वर्षांत महापालिकेच्या प्रशासनाने फेरफार करून सातबारावर आपले नाव चढवले नव्हते. दरम्यान मूळ मालकांची नावे सातबारावर कायम असल्याने लेआऊटधारकांनी त्यांच्याकडून जमीन विकत घेऊन प्लाॅट विकले. रजिस्ट्री करतानाही यावर महापालिकेने प्रशासनाने आक्षेप घेतला नव्हता. २०१३ मध्ये महापालिकेच्या प्रशासनाला जाग आली. यानंतर प्रशासनाकडून जमीन ताब्यात घेण्याचे प्रयत्न झाले. यातील वाठोडा भागातील ३०० ते ४०० भूखंडधारकांना वगळण्यासाठी या भागातील आमदारांनी पुढाकार घेतला होता. यामुळे त्यांना दिलासा मिळाला, अशीच मागणी उर्वरित रहिवाशांची आहे.
...
हजारो लोकांपुढे प्रश्न
वाठोडा व चिखली खुर्द भागात लोकांनी प्लाॅट खरेदी करून घरे उभारली आहेत. सातबारा लेआऊटधारकांच्या नावे असल्याने लोकांनी भूखंड खरेदी करून २० ते २५ वर्षांपूर्वी घरे उभारली. यावर महापालिकेच्या प्रशासनाने आक्षेप घेतला नव्हता. आता ‘साई’च्या प्रकल्पामुळे रहिवाशांना नोटिसा बजावल्या जात आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांत अस्वस्थता परसली आहे. हजारो लोकांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे.