ईव्हीएमवरील मतदानाच्या आकडेवारीला न्यायालयात आव्हान देणार
By कमलेश वानखेडे | Published: December 11, 2024 04:21 PM2024-12-11T16:21:22+5:302024-12-11T16:22:05+5:30
नाना पटोले : व्हीव्हीपॅटवर दिसणारी चिठ्ठी बाहेर निघावी
कमलेश वानखेडे, नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मारकडवाडी येथे मॉक पोल घेणाऱ्या ग्रामस्थांना प्रशासनाच्या माध्यमातून रोखण्यात आले. निवडणूक आयोगाने ईव्हीएमवरील मतदानाच्या आकडेवारीत गडबड केली आहे. आम्ही उत्तर मागितले तर निवडणूक आयोगाने ती वेबसाईटवरून काढून टाकली. रात्रीच्या अंधारात लोकशाही संपवण्याचा पाप झाले. या विरोधात आम्ही न्यायालयात आव्हान देऊ, असा इशारा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, हे सरकार जनभावनेचे नाही अशी चर्चा आहे. अनेक गावांत ग्रामसभेचे ठराव घेतले जात आहे. आता जागतिक पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. रायगड जिल्ह्यात आंदोलन झाले. व्हीव्हीपॅटवर दिसणारी चिठ्ठी बाहेर आली पाहिजे. ती पाहून दुसऱ्या पेटीत टाकता येईल, अशी व्यवस्था करा. अनेक डेमो आले, त्यामुळे शंका दूर करण्याचे काम आयोगाने केले पाहिजे. उत्तर प्रदेश सरकारने मोर्चा काढायचा नाही असा फतवा काढला आहे. विधानसभेत पहिल्या दिवशी अभिनंदन प्रस्तावर अभिनंदन बाजूला ठेवून राजकीय भाषण केल्याचा राजकीय माज दिसून आला. सत्तापक्षातील आमदार स्वतःला खरच आपण निवडून आलो आहोत का हे पाहत आहेत. देशात विरोधीपक्ष नसावा, केवळ सत्तापक्षा असावा असे हे कृत्य सुरू आहे. संघ आणि भाजपचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान नसल्याने भ्रष्टाचारी एका माणसाला श्रीमंत बनवण्याचा काम सुरू असून त्याच्या पैशाच्या भरवश्यावर लोकशाही विकत घेतली जात आहे.
पाकिस्तान आणि बांगलादेश श्रीलंका या देशातील लोकशाही धोक्यात आलेली आहे, तीच परिस्थिती सध्या भारतात आहे पाहायला मिळत आहे. अघोषित आणीबाणी आणली जात आहे. आधारभूत किंमतीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला जात आहे. मोर्चा काढण्याचा अधिकार असताना ते मान्य केले जात नाही आहे. मतदान झाल्यावर आपण गुलाम आहोत, असे वाटत असेल तर ते धोकादायक आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत जनभावना पाहिल्या आहे.
गटनेत्याने नाव हायकमांड ठरवेल
राज्याच्या मुख्यमंत्री पदाची निवड होत असताना विरोधी पक्षनेत्याचाही मार्ग निघेल. नागपूर अधिवेशनात काँग्रेसचा गटनेता पाहायला मिळेल. हायकामंड जे नाव पाठवेल तो गटनेता होईल, असे पटोले यांनी स्पष्ट केले.
अधिवेशन महिनाभर चालावे
हिवाळी अधिवेशन एक महिना चालावे, अशी मागणी आपण सरकारकडे केली आहे. कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, सरसकट कर्जमाफी, हमी भावात वाढ, दीड लाख पद भरणार या मुद्यांवर अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे. महागाई कशी कमी करणार ते सरकारने अधिवेशनात सांगावे, अशी मागणीही पटोले यांनी केली.