विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 21:34 IST2024-10-16T21:28:55+5:302024-10-16T21:34:16+5:30
भाजपा उमेदवारांची तिकिटं ठरविण्याच्या प्रक्रियेत केंद्रस्थानी असलेल्या बावनकुळे यांच्या उमेदवारीचे काय, असा प्रश्न त्यांच्या कामठी मतदारसंघासह राज्यभर चर्चेत आहे.

विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
कमलेश वानखेडे- नागपूर
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे यावेळी कामठी मतदारसंघातून लढणार की नाही याबाबतचा सस्पेंस अजूनही कायम आहे. मी तिकीट मागितले नाही. मी तिकीट मागणारही नाही. केंद्रीय निवडणूक समिती काय निर्णय घेईल हे मला माहीत नाही, असे बावनकुळे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. (Chandrashekhar Bawankule Latest Update)
२०१९ मध्ये कापले होते तिकीट
२०१९ मध्ये युती सरकारमध्ये ऊर्जा मंत्री असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांचे ऐनवेळी तिकीट कापण्यात आले होते. त्यानंतरही बावनकुळे यांनी पक्षाचे काम केले. संयमाचे याचे फळ त्यांना मिळाले व विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली.
कामठीतून कोण लढणार?
त्यानंतर ते पक्षाचे प्रदेशाध्यक्षही झाले. इतर उमेदवारांचे तिकीट ठरविण्याच्या प्रक्रियेत केंद्रस्थानी असलेल्या बावनकुळे यांच्या उमेदवारीचे काय, असा प्रश्न त्यांच्या कामठी मतदारसंघासह राज्यभर चर्चेत आहे. ते लढले नाही, तर उमेदवार कोण असणार, याबद्दलचीही चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत बावनकुळे यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, मी पाच वर्षांपूर्वी १५ वर्षे कामठी मतदारसंघाचा आमदार होतो. गेल्यावेळी मी लढणार होतो. पण मला पक्षाचे काम करण्याचे सांगण्यात आले."
"आता मी पक्षाचा प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करीत आहे. पक्षाला मी तिकीट मागितले नाही. पक्षाला काय वाटते ते माहीत नाही. पण कामठी मतदारसंघात कुणीही उमेदवार दिला तरी भाजपच जिंकेल", असा दावा त्यांनी केला.