कोरोनाचा धोका वाढल्यावरच सिरो सर्वेक्षण करणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 07:00 AM2021-08-03T07:00:00+5:302021-08-03T07:00:07+5:30
Nagpur News नागपूर शहरातील ४९.७ टक्के तर ग्रामीणमधील २१.७ टक्के लोकांच्या शरीरात अॅंटिबॉडी निर्माण झाल्याचे समोर आले होते. यामुळे दुसऱ्या सिरो सर्वेक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचे नियोजन केले जात असताना दुसऱ्या लाटेनंतर किती टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडी निर्माण झाल्याचे सर्वेक्षण होणे गरजेचे होते. परंतु दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत सर्वेक्षणाचे नियोजन झाले नाही. यामुळे कोरोनाचा धोका वाढल्यावरच सिरो सर्वेक्षण होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या सिरो सर्वेक्षणात ५८ टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडीज निर्माण झाल्याचे आढळून आले. नागपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या लहान मुलांमधील कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचणीत २ ते १८ वयोगटातील १०० मुलांमधून १८ मुलांच्या (१८ टक्के ) शरीरात प्रतिपिंडाची (ॲंटिबॉडी) निर्मिती झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, नोव्हेंबर २०२० मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पुढाकाराने व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) ‘पीएसएम’ विभागाच्या सहकार्याने सिरो सर्वेक्षण करण्यात आले. यात शहरातील ४९.७ टक्के तर ग्रामीणमधील २१.७ टक्के लोकांच्या शरीरात अॅंटिबॉडी निर्माण झाल्याचे समोर आले होते. विशेषत: झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांमध्ये ॲंटिबॉडीज तयार होण्याचे प्रमाण सामान्य व उच्चभ्रू वसाहती राहणाऱ्या लोकांपेक्षा तिप्पट होते. यामुळे दुसऱ्या सिरो सर्वेक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हानिहाय डेटा तयार करण्याच्या सूचना
आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व राज्यांना आरोग्य भारतीय वैद्यक संशोधन परिषदेबरोबर (आयसीएमआर) विचारविनिमय करून आपापल्या राज्यात सिरो सर्वेक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. अशा सर्वेक्षणाचा जिल्हानिहाय डेटा तयार करण्याचाही यात सूचना आहेत.
सर्वेक्षणाची गरज का?
तज्ज्ञानुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका बसलेल्या पाच जिल्ह्यांमध्ये नागपूरचा समावेश आहे. जानेवारी ते मे या कालावधीत नागपूर जिल्ह्यात तीन लाख ५० हजार ८३८ रुग्ण, तर चार हजार ९७२ रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली. यामुळे किती टक्के नागपूरकरांमध्ये ॲंटिबॉडीज निर्माण झाल्या याचे सिरो सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. सर्वेक्षणामुळे सार्वजनिक आरोग्यासंबंधी उपाययोजना निश्चित करण्यासाठी मदत होईल. कोरोनाचे नियोजन करताना या बाबी मार्गदर्शक ठरतील.
-एप्रिल महिन्यात होणार होते दुसरे सर्वेक्षण
तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी एप्रिल महिन्यात दुसऱ्या सिरो सर्वेक्षणाची तयारी करण्याचा सूचना मेडिकलच्या ‘पीएसएम’ विभागाला दिल्या होत्या. परंतु कोरोनाची दुसरी लाट याच दरम्यान तीव्र होती. यामुळे सर्वेक्षण पुढे ढकलण्यात आले. नंतर त्यांची बदली झाल्याने सर्वेक्षणाबाबत कुठल्याही सूचना मेडिकलला मिळाल्या नाहीत. आता रुग्णांची संख्या कमी असल्याने सर्वेक्षण करून किती लोकांमध्ये अॅंटिबॉडीज वाढल्याचा अंदाज घेणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
-सिरो सर्वेक्षणाबाबत लवकरच निर्णय
दुसऱ्या सिरो सर्वेक्षणाबाबत तूर्तास तरी कुठलाही निर्णय झाला नाही. परंतु बैठकीमध्ये यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
- योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद