बंद कोविड केअर सेंटर सुरू होणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:11 AM2021-02-21T04:11:28+5:302021-02-21T04:11:28+5:30
नागपूर : कोरोनाचा आणीबाणीच्या काळात रुग्ण शहरातील सहा क्वारंटाईन सेंटरला कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतरीत करण्यात आले. परंतु नोव्हेंबरमध्ये रुग्णसंख्या ...
नागपूर : कोरोनाचा आणीबाणीच्या काळात रुग्ण शहरातील सहा क्वारंटाईन सेंटरला कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतरीत करण्यात आले. परंतु नोव्हेंबरमध्ये रुग्णसंख्या कमी होताच पाचपावली व व्हीएनआयटी सेंटर वगळता आमदार निवास, वनामती, सिम्बायोसिस व ओरिएन्ट ग्रॅण्ड हॉटेल बंद करण्यात आले. आता पुन्हा बाधितांची संख्या वाढत असताना हे सेंटर सुरू होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, घरी स्वतंत्र सोय नसल्यास कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना ठेवण्याचा नियम आहे. परंतु पाचपावली सेंटरमध्ये केवळ २४ रुग्ण आहेत. उर्वरीत ३८८५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. यातील बहुसंख्य रुग्णांकडून नियम पाळले जात नसल्याने धोका वाढला आहे.
कोरोनाचे निदान झालेल्या रुग्णांना वैद्यकीयदृष्ट्या लक्षणानुसार वर्गीकृत केले जाते. लक्षणे नसलेले, सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणे, मध्यम तीव्र लक्षणे व तीव्र लक्षणांनुसार रुग्णांना कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर किंवा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथे दाखल केले जाते. परंतु दरम्यानच्या काळात अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांंना जर त्यांच्या घरामध्ये योग्य सुविधा उपलब्ध असेल तर त्यांच्या संमतीनुसार होम आयसोलेशन केले जाते. सध्या याचे प्रमाण वाढले आहे. नागपूर जिल्ह्यात ५६१७ (शुक्रवारपर्यंत) रुग्ण पॉझिटिव्ह असून १७३२ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. उर्वरीत रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
-होम आयसोलेशनमधील कुटुंबात पसरतोय कोरोना
हवेशीर बंद खोली, स्वतंत्र शौचालय, घरात फिरण्यावर बंधन, घराबाहेर पडण्यास प्रतिबंध असतो. सर्जिकल मास्क वापरणे व दर सहा ते आठ तासाने बदलावे लागते. मास्कचे विघटन करण्यासाठी बीच सोल्यूशन (५ टक्के) किंवा सोडियम हयपोक्लोराईट (५ टक्के) वापरून मास्क डिसइनफेक्ट करावे लागते. घरी दिवस-रात्र काळजी घेणारी व्यक्ती असावी लागते. मोबाईलवरील आरोग्य सेतू अॅपवर अॅक्टिव्ह असावे लागते. या सर्व सोयी असल्यावरच व तसे रुग्णाने प्रतिज्ञापत्र लिहून दिल्यावरच रुग्णाला होम आयसोलेशन केले जाते. परंतु रुग्ण हे सर्व नियम पाळतात का, हा प्रश्न आहे. मागील आठवड्यात होम आयसोलेशमध्ये असलेल्या रुग्णांच्या घरातूनच बाधित रुग्ण मोठ्या संख्येत आढळून येत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
-कोविड केअर सेंटरमधील स्थिती
आमदार निवास : बंद
वनामती : बंद
ओरिएन्ट ग्रॅण्ड हॉटेल : बंद
सिम्बायोसिस : बंद
व्हीएनआयटी : ८ रुग्ण (विमान प्रवासी)
पाचपावली : २४ रुग्ण