कोरोनाचे विघ्न यंदा तरी संपेल का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:10 AM2021-08-15T04:10:24+5:302021-08-15T04:10:24+5:30
काटोल : काटोल शहरातील गणेशोत्सवावर यंदाही कोरोनाचे सावट आहे. मात्र काटोल तालुका कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत असल्याने मूर्तिकारांच्या अपेक्षा बळावल्या ...
काटोल : काटोल शहरातील गणेशोत्सवावर यंदाही कोरोनाचे सावट आहे. मात्र काटोल तालुका कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत असल्याने मूर्तिकारांच्या अपेक्षा बळावल्या आहेत. गत दीड वर्षात लॉकडाऊनची झळ मूर्तिकारांना बसली. गतवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना मंडळावर विविध निर्बंध होते.
काटोल तालुक्यात ४० हून अधिक गणेश मंडळे आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत सरकारकडून नियमावली येण्याची शक्यता आहे. पण सध्याच्या नियमानुसार चार फुटापेक्षा मोठ्या गणेशमूर्तीला परवानगी नाही. ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना गावोगावी राबविण्याबाबत शासन आग्रही आहे. पीओपीच्या मूर्ती विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. अवघ्या एक ते दीड महिन्यावर गणेशोत्सव असला तरी त्याची तयारी आतापासून सुरू झाली आहे. मूर्तिकारांच्या मूर्ती तयार झाल्या आहेत. रंगकामाला सुरुवात झाली आहे, पण उत्साह मात्र दिसून येत नाही. पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने वाहतुकीचे दर वाढले आहे. लाल माती बाहेरील राज्यातून आणावी लागत आहे. तिचेही दर वाढले आहे. परिणामी, गणेशमूर्तीच्या दरात यंदा २५ टक्के वाढ होणार असल्याची माहिती मूर्तिकारांनी दिली.
--
मोठ्या मूर्तींना मागणी नाही
गतवर्षी तयार केलेल्या मोठ्या गणेशमूर्ती शिल्लक आहेत. त्यांचे काय करायचे, असा प्रश्न मूर्तिकारांपुढे आहे. त्यातच दोन-तीन लाखाचे भांडवल अडकले. बाहेरगावी जाणाऱ्या मूर्ती आता दोन वर्षांपासून जात नसल्याचे श्याम गिरोली, अशोक ठाकरे यांनी सांगितले.
-----
गत दहा वर्षांपासून मूर्ती बनविण्याचे काम करून उदरनिर्वाह करीत आहे. दरवर्षी २०० च्या वर छोट्या व मोठ्या मूर्ती बनवून विक्री करायचो. गतवर्षीच्या मोठ्या गणेशमूर्ती, दुर्गामूर्ती आजही तशाच आहेत. याही वर्षी मोठ्या मूर्तींना बंदीच आहे. त्यामुळे यंदाचे वर्षसुद्धा आर्थिक कोंडी करणारे आहे.
जगदीश गाताडे, मूर्तिकार, काटोल