महामंडळांचा तरी लाल दिवा मिळेल का?

By admin | Published: July 10, 2016 02:01 AM2016-07-10T02:01:59+5:302016-07-10T02:01:59+5:30

मंत्रिमंडळाच्या विस्तारात नागपुरातील एखाद्या आमदाराला निदान राज्यमंत्रिपदाची तरी लॉटरी लागेल, अशी

Will the corporations get a red light? | महामंडळांचा तरी लाल दिवा मिळेल का?

महामंडळांचा तरी लाल दिवा मिळेल का?

Next

नागपूर : मंत्रिमंडळाच्या विस्तारात नागपुरातील एखाद्या आमदाराला निदान राज्यमंत्रिपदाची तरी लॉटरी लागेल, अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे आता विविध महामंडळांवर तरी आपल्या आमदाराची नियुक्ती होईल व आपल्या मतदारसंघातही ‘लाल दिवा’ येईल, अशी कार्यकर्ते आस लावून बसले आहेत. मात्र, दुसरीकडे महामंडळांचा गुंता सुटत नसल्यामुळे आमदारांनाही ‘वेटिंग’वरच रहावे लागत आहे.
आ. सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे व सुधीर पारवे हे जुने आमदार आहेत. यांच्यापैकी एकाचीतरी राज्यमंत्रिपदी वर्णी लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र, राज्याच्या इतर भागाचा समतोल साधताना नागपूरचा विचार झाला नाही. आ. कृष्णा खोपडे हे गडकरींचे अत्यंत विश्वासू मानले जातात. भाजपचे शहर अध्यक्ष असताना त्यांच्याच कार्यकाळात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका झाल्या. दोन्ही निवडणुकात भाजपला मोठे यश मिळाले. त्यामुळे खोपडे यांना पहिल्याच फेरीत मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, चंद्रशेखर बावनकुळे यांचा नंबर लागला व सामाजिक समीकरणांमध्ये खोपडे मागे पडले. तेव्हापासून खोपडे यांना राज्यमंत्रिपद किंवा महत्त्वाच्या महामंडळाचे अध्यक्षपद दिले जाईल, असा कयास लावला जात आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारात खोपडे यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते कमालीचे नाराज आहेत. दुय्यम महामंडळ दिले तर ते स्वीकारायचे नाही, असा सूर खोपडे समर्थकांनी लावला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खोपडे यांना लवकरच महामंडळ मिळण्याची शक्यता आहे.
आ. सुधाकर देशमुख यांना राजकारणातील प्रदीर्घ अनुभव आहे. नागपुरातून देशमुख यांना राज्यमंत्री पद देऊन कुणबी समाजाशी भाजप आपले नाते घट्ट करेल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र, तसे झाले नाही. देशमुख यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निवडणूक प्रमुख म्हणून तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष असताना ते त्यांचे मुख्य सल्लागार होते. शिवाय नागपुरात सर्वात कठीण मानला जाणारा पश्चिम नागपूर मतदारसंघ त्यांनी एकतर्फी जिंकला. त्यामुळे देशमुख यांचीही वर्णी महामंडळावर लागू शकते. आ. सुधाकर देशमुख यांना पक्षाचे शहरअध्यक्षपद देऊन संघटनेचची जबाबदारी टाकण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपात अध्यक्षाची भूमिका महत्त्वाची असते.
त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते शांत आहेत. आ. आशिष देशमुख, समीर मेघे, मल्लिकार्जुन रेड्डी हे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत. नवे असले तरी संधी मिळाली तर तेवढाच अनुभव वाढेल, अशा भावना त्यांचे समर्थक बोलून दाखवित आहेत.
(प्रतिनिधी)

माने, कुंभारे यांना नासुप्रवरही संधी नाही
४आ. सुधाकर देशमुख यांची नासुप्रचे विश्वस्त म्हणून मुख्यमंत्र्यांनी नियुक्ती केली होती. मात्र, देशमुख यांनी पदभार स्वीकारला नाही. संबंधित पदी नियुक्ती नको, असे देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना सहा महिन्यांपूर्वीच कळविले आहे. मात्र, त्यानंतरही रिक्त जागेवर डॉ. मिलिंद माने किंवा विकास कुंभारे यापैकी एकाही आमदाराला संधी देण्यात आलेली नाही.
केंद्रीय समित्यांवर नियुक्त्यांचा धडाका
४केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विविध केंद्रीय समित्या, मंडळांवर कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्याचा धडाका सुरू ठेवला आहे. दर महिन्यात एका नव्या मंडळावर नव्या कार्यकर्त्याची नियुक्ती करण्यात आल्याची बातमी ऐकायला मिळते. पण केंद्रीय नियुक्त्यांना मर्यादा आहेत. त्यामुळे राज्यातील समित्यांवर त्वरित नियुक्त्या व्हाव्यात, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.

Web Title: Will the corporations get a red light?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.