नागपुरातील कॉटन मार्केट नेहमीसाठीच बंद होणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 07:28 PM2020-04-19T19:28:40+5:302020-04-19T19:29:24+5:30

१०० वर्षे जुना कॉटन मार्केट भाजी बाजार प्रशासन नेहमीसाठी बंद करणार काय, असा सवाल व्यापारी आणि अडतियांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

Will the Cotton Market Close forever? | नागपुरातील कॉटन मार्केट नेहमीसाठीच बंद होणार काय?

नागपुरातील कॉटन मार्केट नेहमीसाठीच बंद होणार काय?

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : निर्जंतुकीकरणाच्या नावाखाली २८ मार्चला कॉटन मार्केट भाजी बाजार बंद केला. बाजार १ एप्रिलपासून सुरू करण्याची माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महात्मा फुले सब्जी व फ्रूट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीत दिली होती. पण गर्दीचे कारण देत जवळपास २० दिवसानंतरही बाजार सुरू केला नाही. १०० वर्षे जुना कॉटन मार्केट भाजी बाजार प्रशासन नेहमीसाठी बंद करणार काय, असा सवाल व्यापारी आणि अडतियांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.
कॉटन मार्केट आज ना उद्या सुरू होण्याच्या अपेक्षेने शेतकरी आपापल्या गावातून दररोज भाजीपाला विक्रीसाठी आणायचे. पण या ठिकाणी विक्री होत नसल्याने शहरातील अन्य बाजारात कमी भावात विक्री करून मोकळे व्हायचे. या व्यवहारात त्यांना दररोज आर्थिक फटका बसला. तीन दिवसापूर्वी कॉटन मार्केटच्या प्रवेशद्वारावरूनच शेतकऱ्यांना परत पाठविले. या शेतकºयांनी रस्त्याच्या कडेला बसून भाज्या विकल्या आणि गावाकडे परतले. याशिवाय कॉटन मार्केटमधील व्यापारी आणि अडतियांची शहरातील आठ बाजारात व्यवस्था केली आहे. एका अडतियाला दोन शेतकºयांच्या गाड्यामधील भाज्या विकण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे चार बाजार वगळता अन्य चार बाजारात शेतकºयांच्या भाज्यांची विक्री होत नाही. या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी, व्यापारी आणि अडतिया अडचणीत आहेत. यातच कॉटन मार्केट बाजार सुरू न केल्याने त्यांची चिंता वाढली आहे.

जवळपास सात वर्षांपूर्वी कॉटन मार्केटमधील अडतियांना कळमना भाजी बाजारात स्थलांतरित केले तेव्हा येथील ३९ अडतिया कळमन्यात गेले नव्हते. तेव्हापासून ते याच बाजारात कार्यरत आहेत. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीने कॉटन मार्केटची संलग्नता काढली. त्यानंतर या बाजाराचे संचालन मनपा करीत आहे. संत्रा मार्केट ते कॉटन मार्केट चौकापर्यंत जवळपास २२ ते २३ एकर जागा आहे. ही जागा महामेट्रोला विस्तारीकरणासाठी हवी आहे. याकरिता महामेट्रोचे प्रशासन आणि मनपाचे अधिकारी पाठपुरावा करीत आहेत. पण येथील व्यापारी याचा विरोध करीत आहेत. महामेट्रोला ही जागा ताब्यात घेण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत आहे. पण आता कोरोनामुळे कॉटन मार्केट बंद झाल्याने जागा ताब्यात घेण्याची संधी प्रशासनाला मिळाली आहे. सर्व व्यापारी आणि अडतियांना कळमन्यात हलवून प्रशासन जागा ताब्यात घेणार आहे. यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीने अडतियांना जागा देण्याची तयारी चालविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

Web Title: Will the Cotton Market Close forever?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.