विद्युत तारा घेतील का जीव?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:07 AM2021-05-28T04:07:34+5:302021-05-28T04:07:34+5:30
पचखेडी : कुही तालुक्यातील सोनपुरी येथे खांबावरील विद्युत तारा खाली हात पुरेल इतक्या अंतरावर लोंबकळत आहेत. याबाबत महावितरणच्या वेलतूर ...
पचखेडी : कुही तालुक्यातील सोनपुरी येथे खांबावरील विद्युत तारा खाली हात पुरेल इतक्या अंतरावर लोंबकळत आहेत. याबाबत महावितरणच्या वेलतूर कार्यालयाकडे वारंवार तक्रार करण्यात आली. मात्र अद्यापही याची दखल घेतल्या गेली नाही. त्यामुळे लोंबकळत असलेल्या विद्युत तारा एखाद्याच्या जीव गेल्यानंतरच वर केल्या जातील का, असा सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे. बुद्धविहार ते जि.प. शाळेकडे जाणाऱ्या विद्युत पोलवरील तारा खाली लोंबकळत असल्याने रात्रीच्या वेळी ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन तिथून ये-जा करावी लागते. विद्युत तारांमुळे बैलबंडीदेखील घरी न्यायची कशी, असा प्रश्नही ग्रामस्थांपुढे आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने याची दखल घ्यावी, अशी मागणी कैलास खडसिंगे, वैभव मते, सुरेश बांते, दिनेश मेश्राम यांनी केली आहे.
--
महावितरण कंपनीच्या वेलतूर कार्यालयाकडे तक्रार केली आहे. तुमच्या गावाची समस्या लवकरच सोडवू व तिथे नवीन पोल लावू असे सांगण्यात आले आहे, मात्र अद्यापही परिस्थिती जैसे थेच आहे.
- ज्योती मेश्राम, सरपंच, गट ग्रामपंचायत, शिकारपूर