गडावर अपक्ष देणार का प्रस्थापितांना धक्का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:25 AM2021-01-08T04:25:31+5:302021-01-08T04:25:31+5:30
राहुल पेठकर रामटेक : रामटेक तालुक्यातील नऊ ग्राम पंचायतीत प्रचाराचा धुराळा उडाला आहे. यावेळी गडावर प्रस्थापितांना धक्के देण्यासाठी काही ...
राहुल पेठकर
रामटेक : रामटेक तालुक्यातील नऊ ग्राम पंचायतीत प्रचाराचा धुराळा उडाला आहे. यावेळी गडावर प्रस्थापितांना धक्के देण्यासाठी काही गावात अपक्षांनी मोट बांधल्याचे चित्र आहे. तालुक्यात ११ सदस्यीय असलेल्या पंचाळा (बु) ग्रा.मध्ये सर्वाधिक ४२ उमेदवार रिंगणात आहेत. येथे शिवसेना पुरस्कृत स्वतंत्र ग्राम विकास पॅनलने ११ जागेवर उमेदवार केले आहे. या पॅनेलने बहुतांश जुन्याच चेहऱ्यांना संधी दिली आहे. येथे काँग्रेस समर्थित दोन पॅनल उभे आहेत. यात एक परिवर्तन ग्राम विकास आघाडी व कृष्णा बाहे यांच्या पॅनलचा समावेश आहे. यासोबतच भाजपा पुरस्कृत परिवर्तन ग्राम विकास आघाडी पॅनल व अपक्षाचा परिवर्तन जागृती पॅनल असे एकूण पाच पॅनेल पंचाळा (बु) ची सत्ता काबीज करण्यासाठी मैदानात उतरले आहे. येथे मात्र शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशीच थेट लढत होणार आहे. या दोन्ही पक्षांना टक्कर देण्यासाठी भाजपाने दंड थोपटले आहे.
तालुक्यातील शिवनी (भो) येथे ९ जागेसाठी २१ उमेदवार रिंगणात आहे. शिवनी (भों) या गट ग्राम पंचायतीवर यापूर्वी भाजपा समर्थित गटाचे वर्चस्व होते. येथे खरी लढत काँग्रेस व शिवसेनेत आहे. शिवसेना समर्थित स्वतंत्र ग्राम विकास पॅनल तर काँग्रेस समर्थित परिवर्तन ग्राम विकास पॅनल यांच्यात येथे सामना होत आहे. भारत बडवाईक व माजी सरपंच हेमराज बडवाईक हे त्यांच्या पॅनेलची धुरा सांभळत आहे तर दुधराम सव्वालाखे व रुपेश वणवे हे काँग्रेसचा किल्ला लढवत आहे. याही ठिकाणी अपक्ष उमेदवाराने आव्हान उभे केले आहे. रामटेकच्याजवळ असलेल्या मानापूर ग्राम पंचायत निवडणूक मध्ये अपक्ष उमेदवारांची प्रस्थापितांची डोकेदुखी वाढविली आहे. मानापूर व भोजापूर मिळून ही ग्राम पंचायत बनली आहे. येथे ९ जागेसाठी १९ उमेदवार रिंगणात आहेत. या ग्राम पंचायतसाठी तीन पॅनल मैदानात आहेत. यात संदीप सावरकर यांच्या नेतृत्वातील शिव छञपती ग्राम विकास पॅनलने नऊही जागेवर उमेदवार उभे केले आहे. ग्राम विकास आघाडीतर्फे मोरेश्वर हिंगे यांनी ६ उमेदवार उभे केले आहे. यासोबतच ग्राम विकास परिवर्तन आघाडीचे आकाश चांदेकर यानी वॉर्ड क्रमांक १ मध्ये ३ उमेदवार उभे केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे राज्यपातळीवरील नेते ग्रा.पं.निवडणुकीत एकसंघ राहण्याचा मंंत्र कार्यकर्त्यांना देत असले तरी रामटेक तालुक्यातील या तीन ग्रा.पं.मध्ये मात्र स्थानिक कार्यकर्ते मात्र स्वत:च्या वर्चस्वाच्या लढाईसाठी मैदानात उतरले आहे.
पंचाळा (बु.) ग्राम पंचायत
एकूण वार्ड - ४
एकूण सदस्य - ११
एकूण उमेदवार - ४२
एकुूण मतदार - २३०४
पुरुष मतदार - ११९८
महिला मतदार - ११०६
---------
शिवनी भों ग्राम पंचायत
एकूण वॉर्ड - ३
एकूण सदस्य - ९
एकूण उमेदवार - २१
एकूण मतदार - २०५५
पुरुष मतदार - १०३१
महिला मतदार- १०२४
-----------
मानापूर ग्राम पंचायत
एकूण वॉर्ड - ३
एकूण सदस्य - ९
एकूण उमेदवार- १९
एकूण मतदार - १५१९
पुरुष मतदार - ७३४
महिला मतदार - ७८५