‘हेलिकॉप्टर’ उतरवण्यासाठी संंबधित विभागांशी पाठपुरावा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 12:16 AM2019-10-01T00:16:21+5:302019-10-01T00:17:27+5:30
विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी हेलिकॉप्टरने येण्याची इच्छा दर्शवित याबाबत परवानगी मागणाऱ्या एका भावी उमेदवाराचा अर्ज गांभीर्याने घेत जिल्हा प्रशासनाने याबाबत संबंधित विभागाशी पाठपुरावा करण्यात येईल, तरीपण आपण सुद्धा संबंधित विभागाशी संपर्क साधावा, असे अर्जदारास कळविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी हेलिकॉप्टरने येण्याची इच्छा दर्शवित याबाबत परवानगी मागणाऱ्या एका भावी उमेदवाराचा अर्ज गांभीर्याने घेत जिल्हा प्रशासनाने याबाबत संबंधित विभागाशी पाठपुरावा करण्यात येईल, तरीपण आपण सुद्धा संबंधित विभागाशी संपर्क साधावा, असे अर्जदारास कळविले आहे.
एका भावी उमेदवाराला निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी हेलिकॉप्टरने यायची इच्छा आहे. त्यासाठी त्याने रितसर जिल्हा प्रशासनाकडे अर्ज सादर करून कस्तुरचंद पार्क येथे हेलिकॉप्टर उतरवू देण्याची परवानगी मागितली आहे. यावर प्रशासन काय उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जिल्हा प्रशासनाने सुद्धा या अर्जाला गांभीर्याने घेत त्याबाबत नेमकी काय कारवाई सुरु आहे, याची माहिती अर्जदारास कळविली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार (नझूल) के.डी. मेश्राम यांनी संबंधित अर्जदाराला पत्रपाठवून कळविले आहे की, कस्तुरचंद पार्क येथे हेलिकॉप्टर लॅँड करण्यासाठी परवानगी देण्याबाबतचा आपला अर्ज कार्यालयात प्राप्त झाला आहे. सदर परवानगीसाठी हेरिटेज संवर्धन समिती नागपूर शहर, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १, पोलीस उपायुक्त (वाहतूक) नागपूर शहर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सदर आणि मुख्य अग्निशामक अधिकारी महानगरपालिका नागपूर या विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. त्याकरिता या कार्यालयाकडून पत्राद्वारे पाठपुरावा करण्यात येईल, तरीपण आपणसुद्धा संबंधित विभागाशी संपर्क साधावा, असे कळविले आहे.