तर मलाही शहरी नक्षलवादी ठरवणार का? नाट्यसंमेलन अध्यक्ष प्रेमानंद गज्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 10:54 PM2019-02-22T22:54:50+5:302019-02-22T22:55:41+5:30
देशात सर्वत्र भयग्रस्त वातावरण असून सर्वत्र मोकाट झुंडी फिरत आहेत आणि मनामनात भीती पेरली जात आहे. सतत भय दाखविले की त्या भीतीने माणसे गोठून जातात आणि जिवंत माणसे जिवंत मढी होऊन जातात. मी शहरात राहतो आणि माझ्याजवळ जर नक्षली विचारांचं साध पत्रक सापडलं तर मलाही शहरी नक्षलवादी ठरवले जाईल का, अशा शब्दात ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी रार्ज्यकर्त्यांवर घणाघात केला.
निशांत वानखेडे / लोकमत न्यूज नेटवर्क
(राम गणेश गडकरी नाट्य नगरी) नागपूर : देशात सर्वत्र भयग्रस्त वातावरण असून सर्वत्र मोकाट झुंडी फिरत आहेत आणि मनामनात भीती पेरली जात आहे. सतत भय दाखविले की त्या भीतीने माणसे गोठून जातात आणि जिवंत माणसे जिवंत मढी होऊन जातात. मी शहरात राहतो आणि माझ्याजवळ जर नक्षली विचारांचं साध पत्रक सापडलं तर मलाही शहरी नक्षलवादी ठरवले जाईल का, अशा शब्दात ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी रार्ज्यकर्त्यांवर घणाघात केला.
शुक्रवारी अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या ९९ व्या नाट्यसंमेलनाचे उद्घाटन कै. राम गणेश गडकरी नाट्यनगरी, रेशीमबाग परिसर येथे झाले. यावेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. याप्रसंगी संमेलनाचे उद्घाटक महेश एलकुंचवार, नाट्यसंमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार, अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, संमेलनाचे कार्याध्यक्ष गिरीश गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रेमानंद गज्वी यांनी‘भारत माझा देश आहे...’ या कवितेतून आपली वेदना मांडली. मी लेखक कलावंत आहेच, पण सोबतच मी या देशाचा एक नागरिकही आहे. देशात घडणाऱ्या आणि घडलेल्या सर्व घटनांचे तीव्र आघात माझ्या मेंदूवर होत असतात, मेंदू सैरभैर होतो आणि मेंदू भूतकाळाचाही धांडोळा घेऊ लागतो. जगाच्या इतिहासात सिंधू नदीच्या परिसरात बसवलेली सिंधू संस्कृती जी जगश्रेष्ठ होती, ती अचानक कशी नष्ट होते? ४० फूट जाड भिंतीच्या आत वसवलेली सुविहित नगरं कशी नष्ट होतात? वैदिक काळ येतो. वेदाची रचना होते आणि माणूस चार वर्णात विभाजित केला जातो आणि एक माणूस दुसऱ्या माणसाला तुच्छ लेखू लागतो. बुद्ध येतो आणि मग शांततेचं गाणं गात समता येते. महावीर येतो. अहिंसेला साद घालतो. शक, हुण, मुगल, इंग्रज येतात. आक्रमणं करतात आणि या भूमीला गुलाम करतात. मग गुलामीची जाणीव होताच मग १८८५ साली स्वातंत्र्याची चळवळ उभी राहते. देश स्वतंत्र होतो. आणि वाटत राहतं देश, देशातील जनता विवेकाची कास धरील पण देशाला वेगळाच अनुभव येतो. नथुराम गोडसे या हिंदुराष्ट्रवादी व्यक्तीनं महात्मा म्हणून गौरविलेल्या गांधींच्या छातीत पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या आणि गांधींचा खून केला. त्याचा सूड, गोडसे हा खुनी ब्राह्मण जातीचा असल्यामुळे ब्राह्मणांची घरे जाळून घेतला गेला. देश स्वतंत्र झाला आणि अवघ्या ५ महिने १५ दिवसांत सामूहिक विवेकाचा बळी गेला. इंदिरा गांधी यांचा खून बियांतसिंग आणि सतवंतसिंग यांनी स्टेनगनमधून गोळ्यांचा वर्षाव करून केला. हे दोघंही इंदिराजींचे बॉडीगार्ड. धर्मानं शीख म्हणताच असंख्य शिखांचं शिरकाण करण्यात आलं. इथंही विवेकाचाच बळी गेला. इ.स. २००२ साली गोध्रा येथे मुस्लिमांचं शिरकाण करणाऱ्या दंगली आणि भीमा कोरेगावला दि. १ जानेवारी २०१८ रोजी पूर्वजांच्या पराक्रमाला अभिवादन करायला जाणाऱ्या बौद्ध समाजावर होणारे प्राणघातक हल्ले किंवा घरात मांस सापडले नि ते गाईचेच आहे हे ठरवून झुंडीनं घेतलेला ‘तो’ दादरीतला बळी. आणीबाणीच्या काळात हाच अनुभव आला आणि बाबरी मशीद पाडली तेव्हाही. सर्वत्र झुंडी फिरताहेत मोकाट. कुणालाही नक्षलवादी, दहशतवादी ठरविले जाते. असे हे आमचे राज्यकर्ते, ज्यांना आम्हीच निवडून दिलं. ही आमचीच माणसं पण कळत नाही प्रजेशी अशी का वागतात, असा सवाल त्यांनी केला.
प्रेमानंद गज्वी यांनी जातनिहाय होणाऱ्या साहित्य व नाट्यसंमेलनावरही टीका केली. ही सर्व जातनिहाय टोळीबाजांची संमेलने होती आणि असल्याचे परखड मत त्यांनी व्यक्त केले. विजय तेंडुलकर, निळू फुले, डॉ. श्रीराम लागू, गो.पु. देशपांडे, जब्बार पटेल, सतीश आळेकर, महेश एलकुंचवार, सत्यदेव दुबे, अमोल पालेकर अशी मातब्बर मंडळी संमेलनाचे अध्यक्ष का होऊ शकली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कलेची जोपासना करण्यासाठी आजूबाजूचे वातावरण मुक्त हवे असते. ते मिळत नसल्याने स्त्री आपला विकास मर्यादेत करू शकली. स्त्रियांनी शिक्षणाने स्वत:चा स्पेस निर्माण केला, पण मंदिराच्या पायरीवर ती अडखळते. पुरुषांच्या दयेवर अवलंबून न राहता स्त्रियांच्या विकासातील सर्व अडथळे त्यांनी स्वत:च दूर करावे, असे आवाहनही त्यांनी केले. ज्येष्ठ कलावंतांना मिळणाऱ्या मानधनावरूनही त्यांनी सरकारी धोरणावर टीका केली. एवढ्या तुटपुंज्या मानधनात कलावंतांनी गुजराण कशी करावी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.