खरीप हंगाम संपल्यावर पीक कर्ज मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:06 AM2021-07-04T04:06:53+5:302021-07-04T04:06:53+5:30

शरद मिरे भिवापूर : खरीपाचा हंगाम सुरू झाला. पेरण्याही आटोपत आल्या. निसर्गाच्या चक्रव्यूहात दुबार तर कुठे तिबार पेरणीचे संकट ...

Will I get crop loan after kharif season? | खरीप हंगाम संपल्यावर पीक कर्ज मिळणार का?

खरीप हंगाम संपल्यावर पीक कर्ज मिळणार का?

Next

शरद मिरे

भिवापूर : खरीपाचा हंगाम सुरू झाला. पेरण्याही आटोपत आल्या. निसर्गाच्या चक्रव्यूहात दुबार तर कुठे तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर आले आहे. मात्र तालुक्यात अद्यापही १०० टक्के पीक कर्ज वितरण झाले नाही. आतापर्यंत केवळ ४८.७८ टक्के पीक कर्ज वितरण झाले. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना खरीप हंगाम संपल्यावर पीक कर्ज मिळणार का, असा सवाल आता विचारला जात आहे.

१ एप्रिलपासून खरीप पीक कर्ज वितरण सुरू झाले. तालुक्यातील नऊ बँकांसह उमरेड तालुक्यातील चार अशा एकूण १३ बँकांकडे कर्ज वितरणाची जबाबदारी आहे. तालुक्यातील नऊ बँकांनी ३० जूनपर्यंत १,६१२ शेतकऱ्यांना १५ कोटी ४५ लाख ६७ हजार रुपयांचे पीक कर्ज वितरण केले. त्यामुळे ५२ टक्के शेतकरी अद्यापही कर्जापासून वंचित आहेत. उमरेड तालुक्यातील चार बँकांनीसुद्धा तालुक्यात कर्ज वितरण केले आहे. मात्र त्याची नोंद उमरेड प्रशासनाकडे झाल्यामुळे ती आकडेवारी यात घेण्यात आलेली नाही. ३० जूूनपर्यंत तालुक्यातील बँकनिहाय कर्ज वितरण पुढीलप्रमाणे आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया भिवापूर शाखेने १४९ शेतकऱ्यांना १ कोटी ३० लाख ५९ हजार रुपये, बँक ऑफ इंडिया भिवापूर - ३५० शेतकऱ्यांना २ कोटी ८१ लाख ७९ हजार रुपये, बँक ऑफ महाराष्ट्र, नांद - ४०० शेतकऱ्यांना ३ कोटी ४६ लाख १५ हजार रुपये, बँक ऑफ इंडिया, कारगाव- २१३ शेतकऱ्यांना १ कोटी ६८ लाख ८८ हजार रुपये, आयडीबीआय बँक बेसूर - १३० शेतकऱ्यांना १ कोटी ९० लाख १४ हजार रुपये, आयसीआयसीआय बँक, महालगाव - १५ शेतकऱ्यांना ५३ लाख रुपये, आयसीआयसीआय बँक, जवळी - १७ शेतकऱ्यांना २४ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती बँक, भिवापूर - २९८ शेतकऱ्यांना ३ कोटी ५ लाख ६४ हजार रुपये, जिल्हा मध्यवर्ती बँक, नांद - ४० शेतकऱ्यांना ४५ लाख ४८ हजार रुपये अशा प्रकारे तालुक्यातील नऊ बँकांनी १,६१२ शेतकऱ्यांना १५ कोटी ४५ लाख ६७ हजार रुपये पीक कर्ज आतापर्यंत वितरित करण्यात आल्याची माहिती तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी दिली.

लक्ष्यांक ३५ कोटी, कर्ज वितरण २० कोटी

तालुका प्रशासनाने कर्ज वितरण करणाऱ्या १३ बँकांना खरीप हंगामासाठी ३४ कोटी ३९ लाख ७० हजार रुपये पीक कर्ज वितरणाचे लक्ष्यांक (उद्दिष्ट) दिले आहे. त्यापैकी तालुक्यातील नऊ बँकांनी ३० जूनपर्यंत १५ कोटी ४५ लाख ६७ हजार रुपये पीक कर्ज वितरण केले. तर उमरेड तालुक्यातील चार बँकांनी २१ जूनपर्यंत तालुक्यात ४ कोटी ८७ लाख ५ हजार रुपये कर्ज वितरण केले. या १३ ही बँकांचा कर्ज वितरणाचा आकडा २० कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे या बँका प्रशासनाने दिलेले लक्ष्यांक कधी पूर्ण करणार, हा प्रश्नच आहे.

कुठे दुबार आणि कुठे तिबार पेरणी

तालुक्यातील मालेवाडा, जवळी, वाकेश्वर, चिचाळा, पाहमी या भागात कधी पावसामुळे तर कधी पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. पाहमी व चिचाळा येथे तर चौथ्यांदा पेरणी करण्याची वेळ आली आहे. नुकसानीचा सर्व्हे करण्याबाबत तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांना निवेदनही देण्यात आले. अशा कठीण प्रसंगात शेतकऱ्यांना पीक कर्जाची नितांत आवश्यकता आहे.

Web Title: Will I get crop loan after kharif season?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.