संसर्ग वाढणार की थांबणार?

By admin | Published: July 5, 2017 01:52 AM2017-07-05T01:52:02+5:302017-07-05T01:52:02+5:30

रुग्णालयातील कचऱ्याचे योग्य नियोजन न झाल्यास तो घातक ठरू शकतो. परंतु मेडिकलला याचा विसर पडल्याचे चित्र आहे.

Will the infection grow or stop? | संसर्ग वाढणार की थांबणार?

संसर्ग वाढणार की थांबणार?

Next

मेडिकल : महिलांच्या वॉर्डासमोर कचऱ्याचा ढीग
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रुग्णालयातील कचऱ्याचे योग्य नियोजन न झाल्यास तो घातक ठरू शकतो. परंतु मेडिकलला याचा विसर पडल्याचे चित्र आहे. संसर्गजन्य वॉर्डाच्या समोरच कचऱ्याचा ढीग लावून सफाई कर्मचारी मोकळे होतात. विशेष म्हणजे, या कचऱ्याची उचलही नियमित होत नाही. यामुळे पावसामुळे तो कुजून परिसरात दुर्गंधी पसरल्याने रुग्णाचा संसर्ग वाढणार की थांबणार, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
‘स्वाईन फ्लू’सह इतर संक्रमणाचे आजार वाढल्याने शासकीय स्तरावर उपचार मिळावे म्हणून मेडिकलमध्ये ‘संक्रमण आजार नियंत्रण विभागा’चे (संसर्गजन्य वॉर्ड) बांधकाम करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीमधून झालेल्या या बांधकामावर १ कोटी ९१ लाखांचा निधी खर्च झाला. तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने हा वॉर्ड एप्रिल २०१७ रोजी मेडिकलकडे हस्तांतरित केला. येथे स्वाईन फ्लूच्या रुग्णासोबतच वॉर्ड क्र. ३७ व ३८ मध्ये भरती करण्यात येणारे संसर्गजन्य रुग्ण या वॉर्डात ठेवले जाणार होते. परंतु अर्धवट बांधकाम व ‘सेंट्रललाईज्ड आॅक्सिजन लाईन’सह इतरही सोई या वॉर्डात उपलब्ध झाल्या नाहीत. यामुळे तूर्तास याला वॉर्ड क्र. ४९ असे नाव देऊन औषधवैद्यकशास्त्र विभागातील महिला रुग्णांना भरती करून घेण्यात येत आहे. मुख्य रुग्णालयाच्या इमारतीपासून हा वॉर्ड दूर असल्याने डॉक्टरांसह रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शिवाय, कचऱ्याच्या दुर्गंधीचा मोठा सामना करावा लागत असल्याने रुग्ण अडचणीत आले आहेत.

बायोमेडिकल वेस्टच्या जागी रुग्णालयाचा कचरा
वॉर्ड क्र. ४९ समोर पूर्वी रुग्णांवर उपचार केल्यानंतर निघणारा घातक जैविक कचरा (बायोमेडिकल वेस्ट) उघड्यावर टाकला जात होता, ‘लोकमत’ने हा धक्कादायक प्रकार सामोर आणताच स्वत: प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची गंभीर दखल घेत मेडिकलला नोटीस दिली होती. त्यामुळे बायोमेडिकल वेस्टचे योग्य नियोजन होऊ लागले आहे, परंतु आता त्या जागेवर रुग्णालयातील कचरा टाकला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

यात जैविक कचऱ्याचाही समावेश
रुग्णालयातील वॉर्डा-वॉर्डात रुग्णाने वापरलेल्या कापसाच्या बोळ्यापासून इतरही कचरा काळ्या रंगाच्या पिशवीत भरून सर्रास वॉर्ड क्र. ४९ समोर टाकला जातो. हा कचरा उचलण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. परंतु त्यांच्याकडून कचऱ्याची उचल नियमित होत नसल्याची माहिती आहे.

Web Title: Will the infection grow or stop?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.