कधी होणार ट्रीपल आयटी?
By admin | Published: May 8, 2014 02:31 AM2014-05-08T02:31:01+5:302014-05-08T02:49:23+5:30
पुण्याच्या धर्तीवर महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये 'एज्युकेशन हब' तयार करण्यासाठी शासनपातळीवरून प्रयत्न केले जात असले तरी यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी विशेष प्रयत्न ..
जागेचा अडसर : लालफितशाहीचा फटका
नागपूर: पुण्याच्या धर्तीवर महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये 'एज्युकेशन हब' तयार करण्यासाठी शासनपातळीवरून प्रयत्न केले जात असले तरी यात येणार्या अडचणींवर मात करण्यासाठी विशेष प्रयत्न होताना दिसत नाही. 'ट्रीपल आयटी' (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी)साठी जागा उपलब्धतेची अडचण आहे तर प्रस्तावित शासकीय महिला तंत्रनिकेतन सुरू झाले नाही.
नागपुरात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी, महिला तंत्रनिकेतन आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होणार होते. यापैकी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुढच्या वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र ट्रीपल आयटी आणि महिला तंत्रनिकेतनच्या मार्गातील अडचणी कायम आहेत.
केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत २0 आयआयआयटी सुरू करण्याचे जाहीर केले होते. त्यापैकी महाराष्ट्रात नागपूर व पुणे येथे एक केंद्र सुरू होणार होते. या केंद्रासाठी जिल्हा प्रशासनाने मौजा काळडोंगरी (नागपूर ग्रामीण) व मौजा चिचोली ( ता-कामठी) येथील एक अशा दोन जागा प्रस्तावित केल्या. केंद्रीय समितीने या दोन्ही जागांची पाहणी केली. मात्र त्यांना त्या योग्य वाटल्या नाहीत.
समितीने विभागीय आयुक्त यांना याबाबत कळविले होते. समितीने बुटीबोरी पासून ३६ कि.मी. अंतरावरील आणखी एका जागेची पाहणी केली. बुटीबोरी जवळील मौजा मांडवा व मौजा भानसुली येथील जागेचा पर्याय देण्यात आला. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडेसुद्धा जागेची मागणी करण्यात आली .