विद्यापीठाला टेक्नोसॅव्ही करणार, नुकसान भरून काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:11 AM2021-07-07T04:11:07+5:302021-07-07T04:11:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नवनियुक्त कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी विद्यापीठाच्या वित्त व लेखा अधिकारीपदाच्या पाच वर्षांच्या अनुभवाचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवनियुक्त कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी विद्यापीठाच्या वित्त व लेखा अधिकारीपदाच्या पाच वर्षांच्या अनुभवाचा कुलसचिव पदाच्या नवीन इनिंगमध्ये पुरेपूर उपयोग करण्याचे ठरविले आहे. कोरोनामुळे विद्यापीठाला अनेक पातळ्यांवर नुकसान झेलावे लागत आहे. त्यामुळे विद्यापीठात नुकसान कमी करणारे व्यवस्थापन उभे करणे तसेच काळाची आवश्यकता पाहता टेक्नोसॅव्ही करणे यावर भर राहणार असल्याचे त्यांनी मंगळवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
कोरोनामुळे विद्यापीठाचे बरेच नुकसान होत आहे. महसूल घटला असून खर्च कायम आहे. अशा स्थितीत विद्यापीठाचा महसूल वाढविणे व नुकसान कमी करणे यासाठी व्यवस्थापन करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या शुल्कमाफीचादेखील विषय आहे. अनेक विद्यार्थ्यांसाठी शुल्कमाफी गरजेची आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील, असे डॉ. हिवसे यांनी सांगितले. विद्यापीठातील रिक्त पदे हा मोठा मुद्दा आहे. त्यामुळे पदभरती लवकरात लवकर व्हावी यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येतील. सोबतच नॅकच्या दौऱ्याच्या तयारीवरदेखील लक्ष केंद्रित करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कर्मचारी, शिक्षकांसाठी नियमित कार्यशाळा
कोरोनानंतर शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. तंत्रज्ञानाचा उपयोग वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यादृष्टीने विशेष प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशासनातील विविध प्रक्रियांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात येईल. कर्मचारी व शिक्षकांच्या ज्ञानात सातत्याने भर पडावी यासाठी नियमित कार्यशाळा आयोजित करण्यात येतील. पाच वर्षांत विद्यापीठाला नवीन उंचीवर नेण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येतील, असे कुलसचिवांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या सुविधांवर भर
पदव्युत्तर विभाग, वसतिगृह तसेच महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यावर भर असेल. वित्त व लेखा अधिकारीपदी असताना नेमकी कुठे जास्त विकासाची गरज आहे याची कल्पना आली आहे. त्यादृष्टीने योजना राबविण्यात येतील. याशिवाय विद्यापीठात मूलभूत सुविधांचा विकास करण्यासाठीदेखील आराखडा तयार करण्यात येईल, असे डॉ. हिवसे यांनी सांगितले.