नागपुरातील ‘स्मृती’ चित्रपटगृह होणार बंद?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 09:56 PM2018-08-20T21:56:59+5:302018-08-20T22:00:21+5:30
शहराच्या सिने-सांस्कृतिक क्षेत्रातील वैभव ठरलेल्या आणि गेल्या ३३ वर्षांपासून सिनेप्रेमींसाठी नवनव्या सिनेमांची पर्वणी घेऊन येणाऱ्या स्मृती सिनेमागृहाची दारे आता प्रेक्षकांसाठी बंद होणार आहेत. नवा सिनेमा लागला की गर्दी करताना, तिकिटांसाठी झुंबड उडताना आणि प्रसंगी ब्लॅकने तिकीट खरेदी करताना मिळालेल्या आठवणी आता स्मृतिशेष राहणार. २५ वर्षांच्या ‘लीज’वर बांधण्यात आलेल्या या चित्रपटगृहाची लीज संपली असून, त्याच्या नूतनीकरणासाठी चाललेल्या वाटाघाटी सुटत नसल्याने हे सिनेमागृह बंद होण्याचे संकेत मिळत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराच्या सिने-सांस्कृतिक क्षेत्रातील वैभव ठरलेल्या आणि गेल्या ३३ वर्षांपासून सिनेप्रेमींसाठी नवनव्या सिनेमांची पर्वणी घेऊन येणाऱ्या स्मृती सिनेमागृहाची दारे आता प्रेक्षकांसाठी बंद होणार आहेत. नवा सिनेमा लागला की गर्दी करताना, तिकिटांसाठी झुंबड उडताना आणि प्रसंगी ब्लॅकने तिकीट खरेदी करताना मिळालेल्या आठवणी आता स्मृतिशेष राहणार. २५ वर्षांच्या ‘लीज’वर बांधण्यात आलेल्या या चित्रपटगृहाची लीज संपली असून, त्याच्या नूतनीकरणासाठी चाललेल्या वाटाघाटी सुटत नसल्याने हे सिनेमागृह बंद होण्याचे संकेत मिळत आहेत.
शंकरलाल राठी यांच्या आठवणीत १९८५ साली हे चित्रपटगृह बांधण्यात आले होते. त्यावेळी विक्रम बुटी यांच्या जागेवर काही वर्षांच्या लीजवर हे थिएटर बांधण्यात आले होते. जागेच्या लीजची मुदत आता ३० आॅगस्टला संपणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक महिन्यांपासून लीजच्या नूतनीकरणासाठी चर्चा आणि वाटाघाटी सुरू होत्या. मात्र या चर्चा फिस्कटल्यामुळे हे प्रकरण न्यायालयात दाखल झाले. मात्र न्यायालयातही सकारात्मक निर्णय लागताना दिसत नसल्याने, हे चित्रपटगृह बंद होण्याची बातमी बाहेर आली. त्यामुळे ३० आॅगस्ट रोजी सिनेमागृहाचे दरवाजे बंद होणार, असे संकेत दिसून येत आहेत.
दरम्यान, जागेचे मालक विक्रम बुटी आणि चित्रपटगृहाचे संचालक अक्षय राठी यांच्याकडून सिनेमागृह बंद होण्याच्या प्रश्नाला स्पष्ट उत्तर मिळाले नाही. चर्चा सुरू आहेत आणि प्रकरण न्यायालयात असून याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे काय निर्णय होतो आणि टॉकीज बंद होणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यादरम्यान हे सिनेमागृह पाडून त्यावर मल्टिप्लेक्स बांधण्यात येणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. त्यामुळे सिनेमागृह पाडून मल्टिप्लेक्स थिएटर होणार काय? सिनेमागृह राहिले तर ते चालविणार कोण? वाटाघाटींचा सकारात्मक निर्णय लागून टॉकीज किंवा मल्टिप्लेक्स दोन्ही पक्षांकडून समन्वयाने चालणार काय, असे अनेक प्रश्न येत्या काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
हे सिनेमागृह बंद होण्याचा कुठलाही निर्णय अद्याप झाला नाही. लीजचे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित असून, अंतिम निर्णय लागेपर्यंत या विषयावर काही सांगता येणार नाही.
विक्रम बुटी, जागेचे मालक
सिनेमागृह आमचे असले तरी जागा दुसऱ्यांची असून, ती लीज आता संपत आली आहे. प्रेक्षकांच्या भावना आम्ही समजू शकतो व ते निराश होणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. सिनेमागृह राहणार की मल्टिप्लेक्स होणार, हा निर्णय दोन्ही पक्षांच्या समन्वयातून होईल, मात्र याबाबत आता काही सांगता येणार नाही. सध्या सकारात्मक निर्णयासाठी आमच्या वाटाघाटी सुरू असून, येत्या ८ ते १० दिवसात स्थिती स्पष्ट होईल.
अक्षय राठी, संचालक, स्मृती सिनेमागृह
अनेक आठवणी जुळल्या आहेत
सिनेमागृहाचे व्यवस्थापक संतोष मिश्रा यांनी टॉकीजशी अनेक आठवणी जुळल्या असल्याचे सांगितले. १९८५ साली अमिताभ बच्चन यांचा ‘मर्द’ हा पहिला चित्रपट टॉकीजमध्ये लागला होता. तेव्हापासूनचा प्रवास थक्क करणारा आहे. सोयीसुविधांमुळे अल्पावधीत हे टॉकीज शहरातील सिनेमा प्रेक्षकांची पहिली पसंती ठरली होती. अनेक हिट, सुपरहिट चित्रपटांची गर्दी या सिनेमागृहाने अनुभवली आहे. जुन्या काळातील नूतन यांच्यापासून ऐश्वर्या रॉय, संजय दत्त, अभिषेक बच्चन, सोनाली बेंद्रे, सोनाली कुळकर्णी, बोमन इराणी, राजकुमार हिराणी, सुभाष घई अशा चित्रपट क्षेत्राशी जुळलेल्या नामवंत कलावंतांसह क्रिकेट जगतातील सुनील गावस्कर, अझहरुद्दीन तसेच भारतीय व श्रीलंका क्रि केट संघ आणि नुकतेच अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघानेही चित्रपटगृहात सिनेमाचा आस्वाद घेतला आहे. मोबाईल, संगणक अशा आधुनिक साधनांमुळे प्रेक्षकांच्या संख्येत घट झाली असली तरी, मल्टिप्लेक्समुळे सिनेमागृहाला कुठलाही फरक पडलेला नाही. कुटुंबासह सिनेमा बघण्यासाठी आजही या थिएटरला पसंती दिली जाते. थिएटर बंद होण्याची बातमी सोशल मीडियावर पसरल्याने अनेकांनी फोन करून निराशा व्यक्त केली आहे. मात्र सकारात्मक निर्णय येईल, अशी अपेक्षा मिश्रा यांनी व्यक्त केली.