नागपूर रेल्वेस्थानक कधी होणार स्मार्ट?
By admin | Published: May 19, 2017 02:51 AM2017-05-19T02:51:44+5:302017-05-19T02:51:44+5:30
विकासात उपराजधानीत आगेकूच करीत असताना नागपूर रेल्वेस्थानक मात्र स्वच्छतेच्या बाबतीत ढांग ठरले
स्वच्छता पुरस्कारात पिछाडी : प्रशासनाची उदासीनता कारणीभूत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विकासात उपराजधानीत आगेकूच करीत असताना नागपूर रेल्वेस्थानक मात्र स्वच्छतेच्या बाबतीत ढांग ठरले असून चंद्रपूर, बल्लारशा, वर्धा रेल्वेस्थानकाने बाजी मारून नागपूर रेल्वेस्थानकावर मात केल्याचे स्पष्ट झाले आहे.
क्वालिटी कंट्रोल आॅफ इंडियाने देशभरातील ४०७ रेल्वेस्थानकांवर स्वच्छतेबाबत सर्वेक्षण केले. यात नागपूर रेल्वेस्थानकाचा २३७ वा क्रमांक आला असून वर्धा रेल्वेस्थानक ३९ व्या क्रमांकावर, चंद्रपूर ३८ वा क्रमांक, बल्लारशा स्थानकाला ३३ वा क्रमांक मिळाला आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर असलेल्या अस्वच्छतेमुळे या सर्वेक्षणात नागपूरला अव्वल स्थान मिळू शकलेले नाही. रेल्वेस्थानकाच्या स्वच्छतेच्या बाबतीत रेल्वे रुळ, डस्टबीन, शौचालय हे निकष ठेवण्यात आले होते. नागपूर रेल्वेस्थानकावर या तिन्ही बाबीत कमालीची अस्वच्छता असून त्याबाबत नेहमीच प्रसार माध्यमातून टीकाही करण्यात येते. परंतु अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे या बाबीत कोणतीही सुधारणा आजवर होऊ शकलेली नाही.
नागपूरचा नावलौकिक वाढविण्यासाठी आणि प्रवाशांना स्वच्छ रेल्वे परिसर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने वेळीच पावले उचलून रेल्वेस्थानकावरील स्थिती नियंत्रणात आणण्याची गरज निर्माण झाली आहे.
प्रवाशांचे योगदानही महत्त्वाचे
रेल्वे प्रशासनासोबत रेल्वे प्रवाशांनीही स्वच्छतेचे नियम पाळून रेल्वेगाड्या, रेल्वेस्थानकाचा परिसर स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. परंतु अनेक प्रवासी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. केळीची साले प्लॅटफार्म रेल्वे रुळावर फेकणे, शौचालयात पाण्याच्या बॉटल टाकणे, खर्रा, पान खाऊन पिचकाऱ्या मारणे आदी प्रकार करून रेल्वेस्थानकाला अवकळा प्राप्त करून देण्यात प्रवाशांचाही मोठा हातभार आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपली जबाबदारी ओळखून रेल्वे परिसर स्वच्छ ठेवण्याची गरज आहे.
खासगीकरणामुळे वाईट स्थिती
रेल्वे प्रशासनाने रेल्वेस्थानक परिसराच्या सफाईचे कंत्राट खासगी कंत्राटदाराला दिले आहे. त्यामुळे कंत्राटदार पैसे वाचविण्यासाठी कमी मनुष्यबळ कामावर ठेवणे, कामावरील कामगारांना कमी वेतन देणे यासारखे प्रकार करतो. त्यामुळे दिवसेंदिवस रेल्वेस्थानकाच्या स्वच्छतेचा मुद्दा गंभीर बनत चालला आहे. या कंत्राटदारांवर रेल्वे प्रशासनाचा कुठलाच अंकुश राहिलेला नसल्यामुळे रेल्वेस्थानक स्वच्छतेच्या बाबतीत पिछाडले आहे.