नितीन गडकरी सलग तिसऱ्यांदा केंद्रात मंत्री, अतिरिक्त खाते मिळणार का ?
By योगेश पांडे | Published: June 9, 2024 10:48 PM2024-06-09T22:48:53+5:302024-06-09T22:49:21+5:30
२०१४ साली मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतरच नितीन गडकरी यांनी देशभरात कामाचा धडाका लावला होता. त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय महामार्गांचे रुप पालटले व देशात लाखो किलोमीटर लांबीच्या महामार्गांच्या कामाला सुरुवात झाली.
योगेश पांडे
नागपूर : रविवारी झालेल्या शपथग्रहण सोहळ्यात नितीन गडकरी यांनी सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. २०१४ पासून भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदा व गंगा पुनरुत्थान मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी आपल्या कार्यशैलीने विरोधकांनादेखील प्रभावित केले होते. आता परत मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत असताना देशासह विदर्भाच्या विकासाला नवा ‘बूस्टर डोज’ मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
२०१४ साली मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतरच नितीन गडकरी यांनी देशभरात कामाचा धडाका लावला होता. त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय महामार्गांचे रुप पालटले व देशात लाखो किलोमीटर लांबीच्या महामार्गांच्या कामाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे ईशान्येकडील राज्यांमधील महामार्गांचे जाळे विस्तारले. दुसरीकडे गडकरी यांच्या प्रयत्नांतून देशातील जलवाहतुकीलादेखील नवीन संजीवनी मिळाली होती. अनेक वर्ष अडगळीत पडलेला वाराणसी ते हल्दिया हा १ हजार ३९० किलोमीटर लांबीचा जलमार्ग प्रकल्प गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे प्रत्यक्षात उतरला. शिवाय वाराणसी येथे मल्टीमॉडेल हब स्थापन करुन एक इतिहासच रचला. गंगा नदीच्या स्वच्छतेलादेखील गती आली होती. त्यानंतर गडकरी यांच्याकडे केवळ भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयच ठेवण्यत आले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्ममध्ये गडकरी यांच्याकडे कुठले मंत्रालय येणार याबाबत नागपुरकरांना उत्सुकता आहे.
महाराष्ट्र-विदर्भाला मोठ्या आशा
दिल्लीत काम करत असताना गडकरी यांनी महाराष्ट्र व विदर्भाकडे नेहमीच लक्ष ठेवले. यांच्या पुढाकारातून राज्यात प्रत्यक्षात हजारो किलोमीटर लांबीच्या महामार्गांचे काम झालेदेखील आहे. राज्यातील रस्त्यांचे जाळे आणखी मजबूत व्हावे यासाठी गडकरींनी आणखी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
नागपुरात रोजगारनिर्मिती वाढावी
गडकरी प्रतिनिधित्व करत असलेल्या नागपुरचा मागील दहा वर्षांत बराच कायापालट झाला. ‘मेट्रो’ सुरू झाली. शिवाय ‘आयआयएम’, ‘एम्स’ यासारख्या राष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक संस्थादेखील सुरू झाल्या. मोठ्या आयटी कंपन्यांचेदेखील काम सुरू झाले असून शहरात रोजगारवाढीसाठी उद्योग येण्यासंदर्भात गडकरींनी पावले उचलावी अशी अपेक्षा नागपुरकर व्यक्त करत आहेत.