मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही; अस्मितेवर प्रहार करणाऱ्या माजोरड्यांचा माज उतरविणार: CM
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 07:06 IST2024-12-21T07:05:05+5:302024-12-21T07:06:19+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली कठोर भूमिका; राजकारणात शिरलो तर मुंबईतील मराठी माणूस कुणाच्या काळात हद्दपार का झाला याचा विचार करावा लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना आव्हान दिले.

मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही; अस्मितेवर प्रहार करणाऱ्या माजोरड्यांचा माज उतरविणार: CM
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : मुंबई व महाराष्ट्र हा मराठी भाषिकांचाच होता व राहील. मात्र, काही माजोरडे लोक मराठीचा अपमान करताना दिसून येतात. मराठी अस्मितेवर प्रहार करणाऱ्या माजोरड्यांचा माज उतरविण्यात येईल, अशी कठोर भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत मांडली. मराठी माणसांचा होणारा अपमान व परप्रांतीयांच्या मुजोरीचा मुद्दा अनिल परब यांनी उपस्थित करत स्थगन प्रस्ताव मांडला होता.
मराठी माणसांवर परप्रांतीयांकडून होत असलेल्या दादागिरीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. कल्याणमधील अजमेरा हाईटस् सोसायटीतील रहिवासी व एमटीडीसीचा कर्मचारी अखिलेश शुक्ला व त्याच्या पत्नीने वादातून मराठी माणसाला अपमानित करणारे उद्गार काढत मारहाण केली. यातून संतापाची लाट निर्माण झाली. आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे व त्याला तत्काळ निलंबित करण्यात येत आहे. कुणाला काय खायचे याचे स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे. एखाद्या समाजाला शाकाहार महत्त्वाचा वाटला तर तो शाकाहारी संघटना तयार करू शकतो. मात्र, कुणाला न राहू देणे, घर नाकारणे असे अधिकार कुणालाही नाहीत. शाकाहाराच्या आधारावर भेदभाव करणे ही बाब मान्य करता येणार नाही, अशा तक्रारी आल्या तर योग्य कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
या मुद्द्यावरून विरोधकांनी गोंधळ घातला व त्यामुळे परिषदेचे कामकाज सभापती राम शिंदे यांनी १० मिनिटे स्थगित केले. तसेच त्यांनी स्थगन प्रस्तावदेखील नाकारला.
कुणाच्या काळात मुंबईतून मराठी माणूस हद्दपार?
भाजपचे सरकार झाले म्हणून असे झाले, असा राजकीय रंग देण्याचे कारण नव्हते. जर राजकारणात शिरलो तर मुंबईतील मराठी माणूस कुणाच्या काळात हद्दपार का झाला याचा विचार करावा लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना आव्हान दिले.
विरोधकांचे मराठी प्रेम बेगडी : विखे-पाटील
राज्यात मराठी माणसाचा अपमान कुणीच सहन करणार नाही. आमचे सरकार मराठी माणसाच्या मागे उभे राहील. पराभवाच्या दुःखातून या घटनेचे विरोधक राजकारण करत आहेत. विरोधकांकडून मराठी माणसाचे भांडवल करण्यात येत आहे. त्यांनी मराठी माणसांचा केवळ मतांसाठी उपयोग केला असून, त्यांचे मराठी भाषिकांवरील प्रेम बेगडी असल्याचा आरोप मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लावला.
शुक्लाला नोकरीतून बरखास्त करा : परब
अनिल परब म्हणाले की, तुझ्यासारखे ५६ मराठी माझ्या ऑफिसमध्ये झाडू मारतात, असे शब्द अखिलेश शुक्ला याने वापरले. पोलिसांनी अद्यापही शुक्लाला अटक केलेली नाही. त्याला तातडीने नोकरीतून बरखास्त करावे, अशी मागणी परब यांनी केली. या घटनेशिवाय मुलुंड येथे मराठी महिलेला गुजराती व्यक्त्तीने दुकानासाठी जागा दिली नाही. मुंबईचे गुजरातीकरण चालले आहे. भाजपला सत्तेचा माज आला आहे, असा आरोप परब यांनी केला.