मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही : सुरेंद्र जैन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 09:38 PM2020-02-29T21:38:21+5:302020-02-29T21:40:13+5:30
मुस्लिम समाजाचे तुष्टीकरण आता खूप झाले. यापुढे मुस्लिम समाजाला शैक्षणिकच काय तर कुठलेही आरक्षण मिळू देणार नाही. वेळ पडली तर रस्त्यावर उतरू, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त राष्ट्रीय महामंत्री सुरेंद्र जैन यांनी येथे दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुस्लिम समाजाचे तुष्टीकरण आता खूप झाले. यापुढे मुस्लिम समाजाला शैक्षणिकच काय तर कुठलेही आरक्षण मिळू देणार नाही. वेळ पडली तर रस्त्यावर उतरू, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त राष्ट्रीय महामंत्री सुरेंद्र जैन यांनी येथे दिला.
बजरंग दलाचे तीन दिवसीय विदर्भ प्रांत अधिवेशन रेशीमबाग मैदानात सुरू आहे. शनिवारी दुसऱ्या दिवशी रेशीमबाग येथून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेनंतर सायंकाळी चिटणीस पार्क येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला सुरेंद्र जैन मार्गदर्शन करीत होते. यावेळी विहिंपचे विदर्भ प्रांत मंत्री गोविंद शेंडे, विदर्भ उपाध्यक्ष डॉ. हेमंत जांभेकर, देवेश मिश्रा, सुदर्शन शेंडे, हरीश हरकरे, प्रशांत तितरे, नवीन जैन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत असलेले सचिन कावळे व्यासपीठावर होते.
राज्यातील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अलीकडेच मुस्लिम समाजाला शिक्षणात ५ टक्के आरक्षण देण्याचा विचार सुरू असल्याचे वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा धागा पकडून सुरेंद्र जैन यांनी मुस्लिम समाजाला शिक्षणातच नव्हे तर कुठलेही आरक्षण मिळू देणार नसल्याचा इशारा दिला. या मुद्यावर त्यांना उद्धव ठाकरे यांनाही घेरले. यावेळी त्यांनी सीएए कायद्याला विरोध करणारे खरे देशद्रोही असल्याचे सांगितले. गोविंद शेंडे यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त करीत, देशातील सर्व समस्यांशी बजरंग दलाचा कार्यकर्ताच लढू शकतो, असे सांगितले. तत्पूर्वी भूमिपुत्र प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी दांडपट्टा, तलवारबाजी, भाला, शिवकालीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिकेद्वारे लक्ष वेधले.
प्रास्ताविक बजरंग दलाचे प्रांत संयोजक अॅड. अमोल अंधारे यांनी केले. संचालन व आभार निरंजन रिसालदार यांनी मानले.
उद्धव ठाकरे यांनी बांगलादेशी घुसखोरमुक्त करण्याची घोषणा करावी
सुरेंद्र जैन यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावरही प्रहार केले. उद्धव ठाकरे हे खरंच बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार असतील तर त्यांनी बांगलादेशी घुसखोरमुक्त महाराष्ट्राची घोषणा करावी, आम्ही त्यांच्यासोबत उभे राहू, असे आव्हानही दिले.
शोभायात्रेने वेधले लक्ष
रेशीमबाग येथून शोभायात्रा काढण्यात आली. यात छत्रपती शिवाजी महाराज, हनुमानजींचे २१ बालस्वरूप, राम दरबार आणि प्रस्तावित राममंदिराची प्रतिकृती लक्ष वेधून घेत होती. रेशीमबाग, महालमार्गे चिटणीस पार्क येथे समारोप झाला.