कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार नाही; तुकाराम मुंढे भूमिकेवर ठाम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 12:54 PM2020-06-25T12:54:36+5:302020-06-25T12:56:56+5:30
स्मार्ट सिटी प्रकल्प प्रकरणात तुकाराम मुंढेंविरोधात एफआयआर दाखल
नागपूर: आयुक्त विश्वासात घेत नाहीत, विभागातील कामं होत नाहीत, फोन घेतले जात नाहीत, अशा स्वरुपाच्या तक्रारी नागपूरमधील नगरसेवकांकडून तुकाराम मुंढे यांच्याविरोधात केल्या जात आहेत. यावर बोलताना विश्वासात घेण्याची नेमकी व्याख्या काय, असा सवाल आयुक्त मुंढेंनी उपस्थित केला. नगरसेवकांच्या मनासारखं काम केलं, त्यांचं ऐकल्यावर विश्वासात घेतलं आणि त्यांच्या मनाविरुद्ध काही घडलं की विश्वासात घेतलं जात नसल्याची ओरड होत असल्याचं मुंढेंनी सांगितलं.
नगरसेवकांनी केलेल्या वैयक्तीक स्वरुपाच्या टीकेमुळे गेल्या आठवड्यात महासभेतून निघून गेले. त्यानंतर सभागृह स्थगित करण्यात आलं. त्याआधी स्मार्ट सिटी प्रकरणात मुंढे यांच्याविरोधात एफआयआरदेखील दाखल करण्यात आला. आयुक्त ऐकत नाहीत, सभागृह सोडून निघून जातात, अशा तक्रारी नगरसेवकांकडून केल्या जात आहेत. त्यावर भाष्य करताना आयुक्तांवर सभागृह सोडण्याची वेळ कोणी आणली, असा स्पष्ट सवाल मुंढेंनी उपस्थित केला. ते 'बीबीसी मराठी'सोबत बोलत होते.
तुम्ही आवाज चढवून बोलणार असाल तर मी सभागृहात थांबणार नाही, असं आधीच नगरसेवकांना सांगितलं होतं. मात्र तरीही आवाज चढवून वैयक्तिक स्वरुपाची टीका केली गेली. तुम्ही तुकाराम नावाला कलंक आहात, असं म्हटलं गेलं. माझी तुलना ब्रिटिशांशी केली गेली. त्यावेळी महापौरांनी तोंडातून एक शब्द काढला नाही. त्यांनी नगरसेवकांना शांत राहायला सांगणं अपेक्षित होतं. ती त्यांची जबाबदारी होती, असं तुकाराम मुंढे म्हणाले.
कोरोना संकटाच्या काळात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीनं माझं काम सुरू आहे. शहराच्या हितासाठी आवश्यक पावलं उचलली जात आहेत. प्रत्येक निर्णय नगरसेवकांपर्यंत पोहोचवला जात आहे. त्यांच्या शिफारसी मागवल्या जात आहेत. पण अनेकदा कोरोना सेंटर उभारायला विरोध केला जातो. हॉस्पिटल, क्वारंटिन सेंटर शहराच्या बाहेर करा, असे सल्ले दिले जातात. माझं घर सोडून कन्टेनमेंट झोन करा, अशा शिफारशी केल्या जातात. हे सल्ले ऐकले नाही की मग आयुक्त विश्वासात घेत नाही, अशी ओरड सुरू होते. त्यामुळे विश्वासात घेण्याची नेमकी व्याख्या काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नागरिकांच्या हिताशी मी कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली.
आयुक्त तुकाराम मुंढे स्मार्ट सिटी प्रकल्प गुंडाळण्याच्या प्रयत्नात असल्याची टीका नागपूरमधील नगरसेवकांकडून केली जाते. त्या प्रकरणात मुंढे यांच्याविरोधात एफआयआरदेखील दाखल झाला. त्यावर स्मार्ट सिटी प्रकल्प गुंडाळणं आयुक्ताच्या हाती नसतं, असं मुंढेंनी सांगितलं. स्मार्ट सिटी प्रकल्प गुंडाळण्यासाठी सरकारचं नोटिफिकेशन लागतं. त्यामुळे तो प्रकल्प गुंडाळणं माझ्या हातात नाही. या प्रकल्पाच्या सीईओंनी राजीनामा दिल्यानं ती जबाबदारी माझ्याकडे आली. त्यावरून आता आक्षेप घेतला जात आहे. पण ही जबाबदारी माझ्याकडे फेब्रुवारीतच आली. मग नगरसेवकांना ही गोष्ट आताच कशी काय उमगली, असा प्रश्न त्यांनी विचारला. आक्षेप घेणाऱ्यांनी आधी कंपनी कायदा वाचावा, असा सल्लादेखील त्यांनी दिला.