गुन्हेगारी, अवैध धंदे खपवून घेणार नाही : पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 10:39 PM2021-06-16T22:39:17+5:302021-06-16T22:40:04+5:30
Commissioner of Police Amitesh Kumar warns शहरामध्ये गुन्हेगारी व अवैध धंदे खपवून घेणार नाही, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी बुधवारी पाचपावलीतील नवीन नाईक तलाव चौकीच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरामध्ये गुन्हेगारी व अवैध धंदे खपवून घेणार नाही, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी बुधवारी पाचपावलीतील नवीन नाईक तलाव चौकीच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना दिला. नागरिकांनीही घाबरून गप्प बसू नये. त्यांनी गुन्हेगार व अवैध धंद्यांची पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले.
गेल्या महिन्यात नाईक तलाव परिसरात लागोपाठ तीन खून झाले. त्यामुळे लोकमतने बातमी प्रकाशित करून या परिसरातील वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी पोलीस निरीक्षकाची बदली केली व डीबी पथकाच्या अधिकाऱ्यासह २५ कर्मचाऱ्यांना हटवले. तसेच, नाईक तलाव परिसरात प्रभावी पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश दिले. परिणामी, नाईक तलाव चौकीचे नूतनीकरण करण्यात आले. तेथे दाेन सहायक पोलीस निरीक्षक व सहा पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले. ते सर्वजण दोन चार्लींसोबत परिसरात गस्त घालून गुन्हेगार व अवैध धंद्यांवर लक्ष ठेवतील.
पोलीस आयुक्तांनी चौकीच्या उद्घाटनानंतर नागरिकांशी चर्चा केली. नागरिकांनी आधीच्या तुलनेत परिस्थिती सुधारल्याची त्यांना माहिती दिली. पोलीस आयुक्तांनी नागरिकांना पोलिसांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. तसेच, शहरात गुन्हेगार व अवैध धंद्यांना स्थान नाही असे सांगितले. नागरिकांनी गुन्हेगार व अवैध धंद्यांची पोलिसांना माहिती द्यावी. त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल असेही पोलीस आयुक्त म्हणाले. कार्यक्रमात अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी, नवीन रेड्डी, पोलीस उपायुक्त लोहित मतानी, पोलीस अधीक्षक सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक संजय मेंढे आदी उपस्थित होते.
लकडगंज-पाचपावली ठाण्याची समीक्षा
कार्यक्रमापूर्वी पोलीस आयुक्तांनी लकडगंज पोलीस ठाण्यात झोन तीनमधील सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. दरम्यान, त्यांनी लकडगंज व पाचपावली येथील मारहाण, हल्ले इत्यादी घटना थांबवण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले. गेल्या आठवड्यात झोन पाचमधील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती.