पटोले राजकीय संन्यास घेणार का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 01:27 AM2019-05-24T01:27:48+5:302019-05-24T01:29:22+5:30

भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचा आपण नक्कीच पाच लाख मतांनी पराभव करू, असा दावा करीत गडकरींकडून आपला पराभव झाला तर आपण राजकीय संन्यास घेऊ, असे आव्हान काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी दिले होते. आता गडकरी यांच्या एकतर्फी विजयामुळे पटोले हे राजकीय संन्यास घेतील का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Will Patola take a political sanyas? | पटोले राजकीय संन्यास घेणार का ?

पटोले राजकीय संन्यास घेणार का ?

Next
ठळक मुद्देपटोले यांनी गिरीश महाजनांना दिले होते आव्हान : राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचा आपण नक्कीच पाच लाख मतांनी पराभव करू, असा दावा करीत गडकरींकडून आपला पराभव झाला तर आपण राजकीय संन्यास घेऊ, असे आव्हान काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी दिले होते. आता गडकरी यांच्या एकतर्फी विजयामुळे पटोले हे राजकीय संन्यास घेतील का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
निकालाच्या दोन दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत काँग्रेसचे नाना पटोले व भाजपाचे नेते जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आमोरासमोर होते. या चर्चेत पटोले यांनी आपण गडकरी यांना पाच लाख मतांनी पराभूत करू, असा छातीठोक दावा केला. यावर महाजन यांनी तुम्ही फक्त एका मतांनी गडकरींना हरवून दाखवा, मी राजकीय संन्यास घेईल, असे जाहीर केले. पण गडकरी जिंकले तर तुम्हालाही राजकीय संन्यास घ्यावा लागेल, असे प्रतिआव्हान त्यांनी पटोले यांना दिले. पटोले यांनीही जोशात आपणच जिंकू, असा दुबार दावा करीत महाजन यांचे आव्हान स्वीकारले. यावर महाजन यांनी पटोले यांना पुन्हा शब्दावर कायम राहण्याची आठवण करून देत निकालानंतर राजकीय जीवनात दिसू नका, असे स्पष्ट केले. यावर पटोले यांनी शब्दावर कायम राहून राजकीय संन्यास घेऊ, असे जाहीर केले होते.
पहिल्याच फेरीत गडकरी यांनी आघाडी घेताच मतमोजणी केंद्रावर पटोले-महाजन यांच्यातील आव्हानाची चर्चा रंगली. पटोले आता राजकीय संन्यास घेतील का, असा चिमटा भाजपा कार्यकर्ते काँग्रेस कार्यकर्त्यांना घेऊ लागले. नागपूरसह राज्याच्या राजकीय वर्तुळातही याचीच चर्चा रंगली होती. आपण शब्दावर कायम राहणारे नेते आहेत. बोलतो तसेच करून दाखवतो. वैयक्तिक नफा-नुकसानीचा विचार करीत नाही, असे पटोले नेहमी सांगतात. आता पटोले त्यांनीच जाहीरपणे दिलेल्या शब्दावर कायम राहून राजकीय संन्यास घेतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

पटोलेंनी राजकीय संन्यास घेऊ नये- गडकरींची संयमी भूमिका
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पटोले यांनी नितीन गडकरी यांच्यावर बरीच आगपाखड केली. वेळोवेळी त्यांना लक्ष्य केले. शेवटी गडकरींचा एकतर्फी विजय झाला. गिरीश महाजनांचे आव्हान स्वीकारून पटोले फसले. मात्र, त्यानंतरही गडकरी यांनी संयमी भूमिका घेतली. प्रसारमाध्यमांशी बोलताना गडकरी म्हणाले, निवडणूक प्रचारादरम्यान अभिनिवेशात अशाप्रकारे अनेक गोष्टी बोलल्या जातात आणि त्याला काही महत्त्व नाही.नाना पटोले यांनी राजकीय संन्यास घेऊ नये. निवडणुकीत जय-पराजय होतच असतो. त्यामुळे पटोले यांनी तसा विचार करू नये. भारताची लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि जनतेचा कौल स्वीकारणे हेच लोकशाहीसाठी चांगले आहे. गडकरी यांनी अशी सामंजस्याची भूमिका घेत राजकारणात व्यक्तिद्वेष नसावा, असा संदेश दिला.

Web Title: Will Patola take a political sanyas?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.