‘व्हीएनआयटी’च्या हीरक महोत्सवासाठी पंतप्रधान येणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 11:04 PM2019-09-16T23:04:26+5:302019-09-16T23:05:32+5:30
२०२० हे वर्ष ‘व्हीएनआयटी’साठी (विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) हीरक महोत्सवी वर्ष ठरणार आहे. जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हीरक महोत्सवी वर्षाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २०२० हे वर्ष ‘व्हीएनआयटी’साठी (विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) हीरक महोत्सवी वर्ष ठरणार आहे. संस्थेतर्फे हे वर्ष भव्य पद्धतीने साजरे करण्यात येणार आहे. यासाठी संपूर्ण ‘ब्ल्यू प्रिंट’देखील तयार झाली असून पुढी वर्षी जानेवारी महिन्यात पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हीरक महोत्सवी वर्षाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात संस्थेकडून पंतप्रधान कार्यालयाला संपर्कदेखील करण्यात आला असून तेथून सकारात्मक संकेत मिळाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘व्हीएनआयटी’ची (अगोदरचे ‘व्हीआरसीई’) स्थापना १९६० साली झाली होती. या संस्थेतील विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर कर्तृत्व सिद्ध केले. २०२० साली हीरक महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे या महोत्सवाचे मुख्य संरक्षक राहणार आहेत. जानेवारी महिन्यात होणाऱ्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्याचा संस्थेचा मानस होता. पंतप्रधान कार्यालयाशी आमचा संपर्क झाला असून तेथून निमंत्रण मिळाल्याची पोचपावती आली आहे. या सोहळ््यासाठी ते मुख्य अतिथी म्हणून यावेत यासाठी आमचे पूर्ण प्रयत्न सुरू असल्याची माहिती संचालक डॉ.प्रमोद पडोळे यांनी दिली.
नोबेल विजेते शास्त्रज्ञ येण्याची शक्यता
दरम्यान, हीरक महोत्सवी वर्षानिमित्त ‘व्हीएनआयटी’मध्ये वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यात वर्षभर द्विमासिक आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन करण्यात येईल. शिवाय ‘रिसर्च स्कॉलर्स डे’च्या दिवशी नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ येण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘शॉर्टटर्म’ प्रशिक्षणासाठी वर्षभरात ५० कार्यशाळा आयोजित करण्यात येतील व ७० तज्ज्ञ विविध विषयांवर व्याख्यान देतील. सोबतच उद्योगक्षेत्राशी संबंधित उपक्रमदेखील घेण्यात येतील.
सेवाकार्यांवर देणार भर
हीरक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ‘व्हीएनआयटी’कडून सेवाकार्यांवरदेखील भर देण्यात येणार आहे. समाजातील विविध वर्गांसाठी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल. शिवाय विद्यार्थी-प्राध्यापक नियमितपणे अनाथालय, वृद्धाश्रम, झोपडपट्टी, इस्पितळे येथेदेखील सेवाकार्य करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
जागतिक दर्जाच्या १२ प्रयोगशाळा उभारणार
हीरक महोत्सवी वर्षानिमित्त ‘सिमेन्स सेंटर ऑफ एक्सेलन्स’ची स्थापना करण्यात येणार आहे. १८० कोटींच्या प्रकल्पातून १२ जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळा उभारण्यात येतील. यात ‘स्मार्ट फॅक्टरी’चादेखील समावेश असेल. यामाध्यमातून संस्थेसह विविध तांत्रिक महाविद्यालयांतील ५ ते १० हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. शिवाय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगाला चालना देण्यासाठीदेखील या माध्यमातून प्रयत्न होतील, अशी माहिती ‘व्हीएनआयटी’च्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विश्राम जामदार यांनी दिली.