‘पॉलि’चे ‘टेक्निक’ सुधारणार की बिघडणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:07 AM2021-07-20T04:07:42+5:302021-07-20T04:07:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पॉलिटेक्निकच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन १८ दिवस झाले असले, तरी अद्यापपर्यंत हवा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पॉलिटेक्निकच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन १८ दिवस झाले असले, तरी अद्यापपर्यंत हवा तसा प्रतिसाद लाभलेला नाही. आतापर्यंत सुमारे १९ टक्के विद्यार्थ्यांच्या अर्जांचीच नोंदणी झाली आहे. दुसरीकडे दहावीच्या निकालामध्ये ९९ टक्क्यांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यंदा तरी रिक्त जागांचा दुष्काळ संपेल, अशी महाविद्यालयांना अपेक्षा आहे. पुढील चार दिवसांत विद्यार्थ्यांच्या प्रतिसादावर पॉलिटेक्निकच्या प्रवेशाचे नेमके गणित काय राहणार, याचे चित्र समोर येईल.
तंत्रशिक्षण संचालनालयाने दहावीनंतरच्या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांसाठी २९ जून रोजी प्रवेश प्रक्रियेची रूपरेषा जारी केली व ३० जूनपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली. नागपूर विभागात ५० महाविद्यालयांमध्ये एकूण १३ हजार १२६ जागा आहेत. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहतात. मागील १८ दिवसांत फारसा प्रतिसाद लाभलेला नाही. कोरोनामुळे अगोदरच महाविद्यालये अडचणीत आहेत. त्यामुळे त्यांची यंदा प्रवेशाबाबत जास्त अपेक्षा आहेत.
या आठवड्यात गती येणार
दहावीचा निकाल जाहीर झाला असून, यंदा बंपर निकाल लागला आहे. नागपूर विभागाचा निकाल ९९.३४ टक्के लागला आहे. अनेक विद्यार्थी दहावीनंतर पॉलिटेक्निककडे वळत असतात. निकालानंतर गुणपत्रिका हाती आली असून, या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या अर्जांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता, अर्ज दाखल करण्याची मुदतही वाढू शकते.
मागील सत्रात ४४ टक्के जागा रिक्त
२०२०-२१ या शैक्षणिक सत्रात पॉलिटेक्निकच्या ४४ टक्क्यांहून अधिक जागा रिक्त राहिल्या होत्या. १३ हजार ४९२ पैकी ७ हजार ५७३ जागांवरच प्रवेश झाला होता व रिक्त जागांची संख्या ५ हजार ९१९ इतकी होती.
प्रात्यक्षिकांचे गणित बसवावे
कोरोनामुळे सध्या तरी महाविद्यालये ऑनलाइनच होतील, असे दिसत आहे. पॉलिटेक्निकमध्ये तांत्रिक मुद्दे असतात. प्रत्यक्ष निरीक्षण व त्यानंतर स्वत: प्रयोग केल्यानंतर मुद्दा योग्य पद्धतीने समजतो. अशा स्थितीत प्रवेश घेतल्यावर प्रात्यक्षिकांचे गणित कसे समजेल, हा अनेकांच्या मनात प्रश्न आहे.
- यश डहाके
आशादायी चित्राची अपेक्षा
यंदा दहावीचा निकाल चांगला लागला असून, अनेक विद्यार्थी निश्चितपणे पॉलिटेक्निककडे वळतील. विभागात अनेक चांगली महाविद्यालये आहेत. प्रवेश अर्ज नोंदणीचा अखेरचा दिवस २३ जुलै आहे. विद्यार्थी या आठवड्यात नक्कीच मोठ्या प्रमाणात अर्ज भरतील व यंदा प्रवेशाबाबत आशादायी चित्र असेल.
- डॉ.मनोज डायगव्हाणे, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन
चौकट
एकूण महाविद्यालये - ५०
एकूण प्रवेश क्षमता - १३,१२६
आतापर्यंत अर्ज नोंदणी - सुमारे २,५००