खर्च कमी करणार आणि उत्पन्न वाढविणार; आत्महत्या रोखणार, नितीन गडकरी यांचा संकल्प
By गणेश हुड | Published: November 24, 2023 06:23 PM2023-11-24T18:23:05+5:302023-11-24T18:25:56+5:30
तीन दिवशीय ॲग्रोव्हीजन या कृषी प्रदर्शनीला सुरुवात
नागपूर :विदर्भातील सहा जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत. शेतकऱ्यांनी आत्महत्या करूनये, यासाठी ॲग्रोव्हीजनच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. संत्रा, ऊस, कापसासह दूध उत्पादनात वाढ व्हावी, शेतकऱ्यांनी जैविक व नैसर्गिक शेतीकडे वळावे, शेती व्यवसायाला नवी दिशा देण्यासाठी शेतीचा उत्पादन खर्च करून उत्पादकता वाढविण्याचा संकल्प केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री तथा ॲग्रोव्हीजनचे मुख्य प्रवर्तक नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
दाभा येथील पीडीकेव्ही मैदानावर १४ व्या ॲग्रोव्हीजन या कृषी प्रदर्शनाचे गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. यंदाच्या अॅग्रोव्हिजनची संकल्पना शेतकऱ्यांचे प्रशिक्षण कौशल्य विकास आणि कृषी क्षेत्रात विविध तंत्रज्ञानाचा वापर यावर आधारित आहे.
अध्यक्षीय भाषणात गडकरी पुढे म्हणाले, शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुध उत्पादनात वाढ झाली तर शेतकरी आत्महत्या करणार नाही. यासाठी १२ लाख शेतकऱ्यांना गायी वाटप करण्याची महाराष्ट्र सरकाची योजना आहे. ॲग्रोव्हिजन शेतकऱ्यांना ऑर्गेनिक मार्केट उपलब्ध करणार आहे. उर्जा प्रकल्पात कोळशाऐवजी बांबूचा वापर केला तर १० लाख बेरोजगारांना रोजगार मिळेल. डिझेलऐवजी सीएनजीचा वापर केला तर प्रदूषण होणार नाही.
ॲग्रोव्हीजनच्यावतीने २५ ते २७ नोव्हेंबरपर्यंत आयोजित या कृषी प्रदर्शनात ऊस शेती, विदर्भात मत्स्य व्यवसायाचा विकास, बांबू उत्पादनातून संधी, विदर्भाचा दुग्ध विकास या मुख्य परिषदांसह विविध विषयांवर विस्तृत कार्यशाळा होणार आहेत. प्रदर्शनात विविध कृषी निविष्ठाची दालने, बँक, कृषी संशोधन संस्था यांची दालने उभारण्यात आलेली आहेत. या प्रदर्शनाच्या निमित्ताने चार दिवस कृषी क्षेत्रातील पंढरी अवतरणार आहे. यावेळी कृषी प्रदर्शनात शेतीविषयक बाबींवर आधुनिक तंत्रज्ञानावर भर दिला जाणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. अॅग्रोव्हीजनचे आयोजन सचिव रवी बोरटकर यांनी प्रस्ताविकातून अॅग्रोव्हीजनची माहिती दिली.
यावेळी खासदार कृपाल तुमाने, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मीनेश शाह , इंडियन ऑल कार्पेारेशन लि.चे चेअरमन श्रीकांत माधव वैद्य, युपीएलचे चेअरमन रजनीकांत श्राफ, राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार समीर मेघे, टेकचंद सावरकर, अॅग्रोव्हीजन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, आयोजन सचिव रमेश मानकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.