नागपुरात शाळा-महाविद्यालयांना लागणार का ‘ब्रेक’? ठरू शकतात ‘कोरोना’चे ‘हॉटस्पॉट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 11:59 AM2021-02-17T11:59:38+5:302021-02-17T12:00:02+5:30
Nagpur News नागपुरात शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘कोरोना’चा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी ‘ब्रेक’ मिळणार का, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’ नियंत्रणात आल्याने शासनाने शाळा-महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र, आता विदर्भात व विशेषत: नागपुरात परत ‘पॉझिटिव्ह’ची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शाळा-महाविद्यालयांत नावापुरतेच ‘सोशल डिस्टन्सिंग’ व इतर निर्देशांचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘कोरोना’चा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी ‘ब्रेक’ मिळणार का, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
शासन निर्णयानुसार अगोदर शाळा सुरू करण्यात आल्या. आता तर पाचवीपासूनच्या शाळादेखील सुरू झाल्या असून, वर्गदेखील नियमित होत आहेत. नागपूर जिल्ह्यातील दोन हजार ७८० शाळांमध्ये पाचवी ते दहावीच्या साडेसहा लाख विद्यार्थ्यांची नोंदणी आहे. त्यातील अडीच लाखांहून अधिक विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात उपस्थिती लावत आहेत. मात्र, अनेक शाळांत विद्यार्थी ‘मास्क’ लावत नसल्याचे दिसून आले आहे.
दुसरीकडे नागपूर जिल्ह्यात विद्यापीठाशी संलग्नित सुमारे तीनशे महाविद्यालये असून, तेथे लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पहिले दोन दिवस विद्यार्थ्यांची वर्गखोल्यांतील उपस्थिती संमिश्र राहिली. अनेक महाविद्यालयांत विद्यार्थी आले, मात्र ते वर्गखोलीत न जाता परिसरातच घुटमळत असल्याचे निदर्शनास आले. त्यातही ‘सोशल डिस्टन्सिंग’ वगैरे बाबी जास्त गंभीरतेने पाळल्या जात नसल्याने धोका संभवण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यात परत ‘कोरोना’चे आकडे वाढत असताना आता तातडीने उपाययोजना करून शाळा-महाविद्यालयांना ‘ब्रेक’ लावण्यात यावा, अशी मागणी काही पालकांकडून करण्यात आली आहे. मात्र, यासंदर्भात जिल्हा प्रशासन किंवा विद्यापीठाने अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. , जिल्हा प्रशासन पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे, सध्या तरी शाळा बंद करण्याचा कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठाची भूमिका, जिल्हा प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करणार
शासनाच्या निर्देशांनुसार आम्ही महाविद्यालयांत प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याची परवानगी दिली. जिल्हा प्रशासनाकडून आम्हाला अद्याप तात्पुरता ‘ब्रेक’ घेण्याचे कुठलेही निर्देश आलेले नाही. स्थानिक प्रशासनाच्या निर्देशांचेच विद्यापीठ पालन करेल, असे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी स्पष्ट केले.